
ग्रॅज्युएट मॅनेजमेंट अॅडमिशन कौन्सिल (GMAC) च्या नवीन श्वेतपत्रिकेनुसार, अमेरिकन विद्यापीठांमध्ये हिंदुस्थानी विद्यार्थ्यांच्या नोंदणीत किमान 45 टक्के ची मोठी घट झाली आहे. ही घट प्रमुख आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमधील मोठी घट आहे. विद्यार्थ्यांची संख्या कमी होण्याच्या कारणांमागे, व्हिसा आणि नोकरीतील अनिश्चितता ही महत्त्वाचे कारणे असल्याचे मानले जात आहे.
या श्वेतपत्रिकेमध्ये हिंदुस्थानी विद्यार्थ्यांनी का अमेरिकेच्या विद्यापीठांकडे पाठ वळवली यासंदर्भातील कारणेही नमूद करण्यात आली आहेत. डॉलरच्या तुलनेत हिंदुस्थानी रुपयाचे अवमूल्यन झाल्याने हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची क्रयशक्ती देखील कमी झाली आहे.
ऑगस्ट २०२५ पर्यंत अमेरिकेत एकूण नवीन आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये वर्षानुवर्षे (YoY) मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे ही घसरण झाली आहे. तथापि, GMAC पेपरमध्ये असे नमूद केले आहे की, हिंदुस्थानी नोंदणीतील घट चीन, दक्षिण कोरिया, नायजेरिया आणि इतर देशांपेक्षा खूपच गंभीर आहे. अमेरिकेत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे.
मे २०२५ मध्ये डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने विद्यार्थी व्हिसा मुलाखती तात्पुरत्या स्थगित केल्याचा उल्लेख या पेपरमध्ये करण्यात आला होता. यामुळेही हिंदुस्थानातील विद्यार्थ्यांचे चांगलेच नुकसान झाले होते. ऐनवेळी या व्हिसाच्या अटीमुळे प्रवेश मिळवलेले आणि फी भरलेले अनेक विद्यार्थी शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी वेळेवर कॅम्पसमध्ये पोहोचू शकले नाहीत, असे या श्वेतपत्रिकेमध्ये नमूद करण्यात आले आहे.
जानेवारी २०२५ मध्ये डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने सत्ता हाती घेतल्यानंतर हे चित्र अधिकच पालटले. अमेरिकेतील पदवीधर व्यवस्थापन कार्यक्रमांमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची आवड सातत्याने कमी होत असल्याचे या श्वेतपत्रिकेमध्ये आढळून आले आहे.





























































