
हिंदुस्थान आणि मुंबई क्रिकेटसाठी भरीव कामगिरी करणाऱ्या माजी खेळाडूंचा सन्मान म्हणून मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमच्या एका स्टँडला हिंदुस्थानचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक, मुंबईचे माजी कर्णधार रवी शास्त्री यांचे नाव देण्यात येणार आहे. तसेच गेट नंबर तीन, पाच आणि सहाला सुद्धा मुंबईच्या माजी खेळाडूंची नावं देण्यात येणार आहेत.
मुंबई क्रिकेट असोसिएशनची नुकतीच एक महत्तवपूर्ण मीटिंग पार पडली. या मिटींगमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्थानाचे माजी खेळाडू, मुंबईचे माजी कर्णधार आणि़ माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे नाव वानखेडे स्टेडियममधील प्रेस बॉक्सच्या खाली लेव्हल १ स्टँडला देण्यात येणार आहे. त्याचबरोबर दिवंगत दिलीप सरदेसाई यांचे नाव गेट नंबर तीनला, डायना एडुल्जी यांचे नाव गेट नंबरला पाचला आणि एकनाथ सोंडकर यांचे नाव गेट नंबर सहाला देण्यात येणार आहे.
मुंबईच्या आणि हिंदुस्थानच्या क्रिकेटसाठी मुंबईच्या माजी खेळाडूंचे जे योगदान आहे. त्यांचा एक सन्मान करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे अजिंक्य नाईक यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वानखेडे स्टेडियमवरील रवी शास्त्री स्टँड आणि इतर नावांच्या गेट यांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली.





























































