
राज्यात गेल्या पाच वर्षांत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात एपूण 420 जणांनी जीव गमावला आहे. त्यापैकी 248 जणांचा वाघाच्या तर 104 जणांचा बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. तसेच वन्यप्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी शासन स्तरावर कठोर उपाययोजना करणार, अशी घोषणा नाईक यांनी केली. राज्यात चंद्रपूरसह इतर जिल्ह्यांतील वन्यप्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आमदार सचिन अहिर, सुनील शिंदे, प्रवीण दरेकर आदींनी तारांकित प्रश्न विचारला होता.
घाटी रुग्णालयास एम्स दर्जासाठी पाठपुरावा करणार
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व घाटी रुग्णालयास एम्स दर्जा मिळावा यासाठी पेंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेत सांगितले. आमदार विक्रम काळे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर मुख्यमंत्री स्तरावरून पेंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. या प्रस्तावाचा आपण पाठपुरावा करणार असल्याचे मंत्री मुश्रीफ म्हणाले. अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी तीन जागांची निवड केली असून त्यासंदर्भात समिती लवकरच अंतिम निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईतील वन जमिनीवरील रहिवाशांना सुविधा द्या!
दहिसर, बोरिवली आणि कांदिवली येथील वन जमिनीवर राहणाऱया रहिवाशांना अजूनही मूलभूत नागरी सुविधा मिळत नाहीत. या रहिवाशांसाठी मानवतावादी दृष्टिकोन समोर ठेवून त्यांना शासनाने मूलभूत सुविधा देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेवेळी केली.

























































