
राज्यात अल्पवयीन मुलींचा विनयभंग होण्याचे प्रकार वाढले असून बदलापुरात अशा घटना वारंवार घडतायत. विधान परिषदेत शुक्रवारी याचे तीव्र पडसाद उमटले. असे प्रकार सातत्याने का घडतात? यापूर्वीच्या घटनेतून सरकारने बोध घेतला नाही का, असा संतप्त सवाल करत शिवसेनेने सरकारला धारेवर धरले. त्यावर विशेष ड्राइव्ह राबवून अजूनही ज्या स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही तसेच महिला मार्शल नसतील याचा आढावा घेण्याचे आदेश आजच परिवहन विभाग आणि पोलिसांना देण्यात येतील. नियमांचे उल्लंघन करणाऱया स्कूल बस आणि संस्थाचालकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.
बदलापूरमध्ये शालेय मुलांना ने-आण करणाऱया व्हॅनचालकाने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. बदलापुरात अशा घटना वारंवार घडत असल्याने अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी याबाबत स्थगन प्रस्ताव मांडला. सरकारने स्कूल बससाठी नियमावली तयार केली. परंतु नियमांचे पालन नीट होत नाही. शाळेत जाताना मुले सुरक्षित नसतील तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधत या मुद्दय़ावर चर्चा करण्याची आणि असे प्रकार रोखण्यासाठी सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या याची माहिती सभागृहाला द्यावी, अशी मागणी आमदार अहिर यांनी केली. हा विषय व्यासपीठावर चर्चेसाठी आलाच पाहिजे, अशी मागणी आमदार अॅड. अनिल परब यांनीही लावून धरली. याची दखल घेऊन लवकरच लक्षवेधी चर्चेसाठी आणली जाईल, असे सभापती राम शिंदे यांनी सांगितले.
बदलापुरात पुन्हा अशी घटना घडली आहे. यापूर्वीच्या प्रकरणात शाळेचे संस्थापक दोषी आढळून आले. त्यावर कारवाई करण्याऐवजी स्वीपृत नगरसेवक केले. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारचा धाक नसल्याने असे प्रकार वाढीस लागले आहेत, असा आरोप विरोधकांनी केला. दरम्यान, स्कूल बस नियमावलीचे उल्लंघन करणाऱया संस्थाचालकांवर कारवाई केली जाईल, असे मंत्री देसाईंनी सांगितले.

























































