
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षात वित्त आणि नियोजन विभागाकडे 5 हजार 975 कोटी 51 लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज विधानसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना -2017 अंतर्गत कर्जमाफीस पात्र असलेल्या 50 लाख 60 हजार शेतकऱयांपैकी 44 लाख 4 हजार शेतकऱयांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित 6 लाख 56 हजार शेतकऱयांना लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे. तर महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पात्र असलेल्या 32 लाख 42 हजार शेतकऱयांपैकी 32 लाख 29 हजार शेतकऱयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आल्याचे पाटील यांनी उत्तरात नमूद केले आहे.
4 हजार 601 कोटीची एफआरपी थकीत
राज्यातील साखर कारखान्यांनी सन 2025-26 या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱयांची 4 हजार 601 कोटी रुपयांची एफआरपी (उचित लाभकारी मुख्य) थकवली असल्याची माहिती बाबासाहेब पाटील यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे. विहित कालावधीत एफआरपी देयके अदा न केल्यास कलम 3 (3अ ) नुसार विलंब कालावधीसाठी 15 टक्के व्याज आकारण्याची तरतूद असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.



























































