
आजचा सामना न्यूझीलंड-इंग्लंड यांच्यात असला तरी क्षणाक्षणाला पाकिस्तानी संघ आणि त्यांच्या चाहत्यांची धाकधूक वाढत होती. इंग्लंडची 6 बाद 117 अशी अवस्था झाली तेव्हा पाकिस्तानचे ठोके चुकायला लागले होते, पण तेव्हाच विल जॅक्सने रेहान अहमदच्या साथीने 15 चेंडूंत 44 धावा चोपून काढल्या आणि न्यूझीलंडचाच गेम केला. या विजयामुळे न्यूझीलंडवर सुपर एटमध्ये बाद होण्याचे संकट ओढवले, तर पाकिस्तानला नवसंजीवनी मिळाली.
न्यूझीलंडच्या टीम सायफर्ट आणि फिन अॅलनने 7 षटकांत 64 धावांची सलामी देत डावाची सुरुवात केली, पण ही जोडी फुटल्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी 8 च्या सरासरीनेच धावा वसूल केल्या. धावांचा वेग कमी झाल्यामुळे न्यूझीलंडचा रनरेटही खाली येऊ लागला. ग्लेन फिलीपने डावातील सर्वोच्च 39 धावांची खेळी करत संघाचा दीडशतकी पाया मजबूत केला.
न्यूझीलंडच्या 160 धावांचा पाठलाग करताना पहिल्या दोन षटकांतच इंग्लंडने फिल सॉल्ट (2) आणि जॉस बटलरला (0) गमावल्यामुळे इंग्लंड हादरला होता.पण त्यानंतर हॅरी ब्रूकपासून टॉम बॅण्टन, जेकब बेथेल, सॅम करन आणि विल जॅक्स या सर्वांनी धडाकेबाज फलंदाजी करत संघाला विजयासमीप नेले.




























































