
ओडिशामधील जगतसिंगपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घडली. येथे एका 23 वर्षीय तरुणीवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार करून तिला चार मजली इमारतीवरून फेकून देण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेत पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी आणि एका परप्रांतीय व्यक्तीला अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 22 फेब्रुवारी रोजी घडली. पीडित तरुणी आपल्या प्रियकरासोबत लग्न करण्याच्या उद्देशाने घरातून बाहेर पडली होती. प्रियकराने तिला एका मंदिरात भेटायला बोलावले होते. मात्र, मंदिरात नेण्याऐवजी त्याने तिला एका अनोळखी ठिकाणी नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने पीडितेला बस स्थानकाजवळ सोडून पळ काढला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी अंकित कुमार वर्मा यांनी दिली.
आरोपी पीडित तरूणीला बस स्थानकानवर सोडून गेल्यामुळे ती खूप घाबरली होती. तरूणी बस स्थानकावरच बसची वाट बघत थांबली होती. यावेळी झारखंडचा रहिवासी असलेल्या एका दुचाकीस्वाराने तिला घरी सोडण्याचे आमिष दाखवले. मात्र, मदत करण्याऐवजी त्याने तिला पारादीप येथील आपल्या भाड्याच्या खोलीवर नेले. तिथे त्याने पीडितेवर पुन्हा बलात्कार केला. यानंतर पीडितेने याबाबत कोणालाही काही सांगू नये यासाठी या नराधमाने तिला इमारतीच्या छतावरून खाली ढकलून दिले, ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा मृतदेह पोलिसांना सापडला.
पीडितेच्या भावाने 22 फेब्रुवारी रोजी आपली बहीण बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, 25 फेब्रुवारी रोजी भावाने बहिणीवर बलात्कार आणि तिची हत्या झाल्याची तक्रार दिल्यानंतर तपासाला वेग आला. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोन्ही आरोपींना भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये अटक केली असून त्यांच्यावर अपहरण, बलात्कार आणि हत्येचे गुन्हे दाखल केले आहेत.

























































