
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून त्यांच्या प्रत्येक पोस्टची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. नुकतीच त्यांनी ‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मानवी स्वभाव आणि जगाच्या रितीवर भाष्य केले आहे. “प्रामाणिक माणसं जगाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात नक्कीच भेटतात, पण दुर्दैवाने पृथ्वी गोल आहे,” अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय, याबाबत सध्या सोशल मीडियावर तर्कवितर्क लावले जात आहेत.
अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युजरने म्हटले की, बिग बी नक्कीच काहीतरी गंभीर विषयावर बोलत आहेत. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, जगाच्या पाठीवर प्रामाणिक लोकांना शोधणे किती कठीण झाले आहे, हेच त्यांनी भौगोलिक संदर्भाने स्पष्ट केले आहे. काहींनी याला त्यांचे ‘कंन्फेशन’ मानले असून, या गुढ पोस्टमागील त्यांचा नेमका हेतू काय असावा, याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.
T 5670 –
” loyal men are found in every corner of the World but unfortunately the Earth is round “~ ef ba
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 26, 2026
अमिताभ बच्चन हे दर रविवारी मुंबईतील आपल्या ‘जलसा’ या निवासस्थानी चाहत्यांना न चुकता भेटतात आणि त्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करतात. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांनी केलेल्या एका पोस्टमुळे चाहत्यांच्या मनात चिंतेचे वातावरण होते. कामाच्या व्यापात दिवस कसा संपतो हे समजत नाही, असे सांगतानाच त्यांनी रविवारी जलसाबाहेर कोणाचीही गर्दी नसेल, असे सूचित केले होते. “दुर्दैवाने या रविवारी जलसाच्या गेटवर कोणीही नाही, त्यामुळे तुमच्या प्रवासाची ऊर्जा वाचवा आणि आपण लवकरच भेटू,” असे त्यांनी नमूद केले होते. सातत्याने कामात व्यग्र असलेले बिग बी सध्या शांततेत आणि विचारात वेळ घालवत असल्याचे त्यांच्या पोस्टवरून जाणवत आहे.




























































