किरीट सोमय्या विरुद्ध इम्तियाज जलील वाद विकोपाला; 10 कोटींच्या मानहानीच्या नोटिसीला जलील यांचे जशास तसे उत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या आणि एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांच्यातील राजकीय संघर्ष आता कायदेशीर वळणावर पोहोचला आहे. किरीट सोमय्या यांनी इम्तियाज जलील यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करत 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. एका भाषणादरम्यान जलील यांनी सोमय्या यांचा उल्लेख ‘तोतला’ असा केल्याचा आरोप करत, यामुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी जलील यांना कायदेशीर नोटीस धाडली असून, दोन राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये जाहीर माफी मागावी, अशी मागणीही केली आहे. तसेच मुंब्रा येथील मुख्य चौकात कथित आक्षेपार्ह रील प्रसारित करण्याची धमकी दिल्याचा आरोपही सोमय्या यांनी जलील यांच्यावर ठेवला आहे.

या नोटिसीला इम्तियाज जलील यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून अत्यंत आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. सोमय्या यांनी केलेला हा दावा म्हणजे विनाकारण प्रकरण तयार करण्याचा प्रयत्न असल्याचे जलील यांनी म्हटले आहे. जलील यांनी आपल्या पोस्टमध्ये सोमय्या यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत विचारले की, मुस्लिमांविषयी तुमची भाषा, तुमचा सूर आणि तुमच्या भावना आक्षेपार्ह नाहीत का? तुम्ही भारतीय मुस्लिमांना निर्लज्जपणे ‘घुसखोर’ आणि ‘परके’ म्हणता, तेव्हा तुमच्या प्रतिष्ठेचे काय होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सोमय्या यांच्या विचारसरणीमुळेच मदरसा आणि मुस्लिम बहुसंख्य भागांना लक्ष्य केले जात असल्याची टीकाही जलील यांनी केली.

इम्तियाज जलील यांनी पुढे म्हटले आहे की, सोमय्या हे जाणीवपूर्वक मुंब्रा, मालेगाव आणि मानखूर्द यांसारख्या मुस्लिम बहुल भागांना लक्ष्य करत असून समुदायाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर खोटे आरोप करून केवळ सांप्रदायिक राजकारण भडकवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. “एखाद्या समुदायाचा वारंवार छळ करणे गुन्हा आहे की त्या छळाविरुद्ध आवाज उठवताना छळ करणाऱ्याला ‘तोतला’ म्हणणे गुन्हा आहे, याचा निर्णय जनतेनेच घ्यावा,” असे आवाहन जलील यांनी केले आहे. संविधानावर आणि न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे सांगत जलील यांनी “आता न्यायालयातच भेटू,” असे खुले आव्हान किरीट सोमय्या यांना दिले आहे.