
साऊथ इंडस्ट्रिचा सुपरस्टार अभिनेता आणि तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) चे प्रमुख थलपती विजय यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 1999 रोजी विवाहबंधनात अडकलेला अभिनेता थलपती विजय आणि त्याची पत्नी संगीता या जोडीने आपल्या 26 वर्षांच्या वैवाहिक प्रवासाला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे. संगीता यांनी विजय यांच्यावर नामांकित अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा करत चेन्नईजवळील चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात (Chengalpattu Family Court) अधिकृतपणे घटस्फोटाची याचिका दाखल केली असून, यामुळे सिनेसृष्टीत चर्चांना उधाण आले आहे.
कोण आहे संगीता सोरनालिंगम?
दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयची पत्नी संगीता सोरनालिंगम या मूळच्या श्रीलंकेतील एका मोठ्या उद्योगपतीची मुलगी आहे. श्रीलंकन तमिळ वंशाच्या असलेल्या संगीता यांचे बालपण आणि शिक्षण ब्रिटिशमध्ये झाले असून, लग्नापूर्वी त्या ब्रिटीश नागरिक होत्या. विजयच्या प्रेमापोटी त्यांनी लंडन सोडून हिंदुस्थानात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता.
विजय आणि संगीता यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. 1996 मध्ये विजयचा ‘पूवे उनक्कागा’ हा चित्रपट पाहिल्यानंतर संगीता त्याच्या मोठ्या चाहती बनल्या होत्या. चित्रपटाच्या यशानंतर विजयचे अभिनंदन करण्यासाठी त्या खास लंडनहून चेन्नईला आल्या होत्या. संगीता यांनी विजयला भेटण्यासाठी घेतलेल्या परिश्रम पाहून विजय भारावून गेला होता. यानंतर त्याने संगीता यांना आपल्या घरी आमंत्रित केले. इथूनच त्यांच्या प्रेमकथेला सुरूवात झाली. यानंतर त्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
संगीता विजय यांच्या प्रेमात आकांत बुडाल्या होत्या. संगीता आणि विजय यांच्या वाढत्या प्रेमामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने 25 ऑगस्ट 1999 रोजी विजय आणि संगीता विवाहबंधनात अडकले. विजय ख्रिश्चन धर्मीय असून संगीता हिंदू कुटुंबातील आहेत, मात्र त्यांचा विवाह हिंदू रितीरिवाजांनुसार चेन्नईमध्ये अत्यंत थाटामाटात पार पडला होता. या सुखी संसारानंतर 2000 मध्ये त्यांना मुलगा जेसन संजय आणि 2005 मध्ये मुलगी दिव्या साशा अशी दोन अपत्ये झाली. गेल्या 27 वर्षांपासून हे जोडपे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील ‘पॉवर कपल’ मानले जात होते.
फक्त एका सिनेमामुळे विजय यांच्या प्रेमात बुडालेल्या संगीताने आता लग्नाच्या 26 वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. या घटस्फोटाच्या वृत्ताने विजयच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो आणि जुन्या आठवणी व्हायरल होत असून, या लोकप्रिय जोडीमध्ये दुरावा का निर्माण झाला, याबाबत विविध चर्चा रंगत आहेत. मात्र यावर अद्यापही विजय यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
तमिळ सुपरस्टार, टीव्हीके प्रमुख विजयच्या पत्नीने दाखल केला घटस्फोटासाठी अर्ज



























































