साय-फाय – मून सिटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या आणि टेस्ला, स्पेसएक्ससारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरलेल्या जगप्रसिद्ध कंपन्यांचे मालक इलॉन मस्क यांनी नुकतीच आपल्या पोस्टद्वारे चंद्राबद्दल एक मोठी घोषणा केली आहे. त्यांची स्पेसएक्स ही अंतराळ कंपनी चंद्रावर एक सेल्फ ग्रोइंग सिटी बांधण्याकडे लक्ष केंद्रित करणार आहे. चंद्रावर उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर करून हळूहळू विस्तार करत जाणारे शहर बांधण्याची स्पेसएक्सची योजना आहे. यासंदर्भात कोणताही आराखडा किंवा इतर विस्तृत कल्पना त्यांनी जाहीर केलेली नाही.

गेल्या वर्षीपर्यंत स्पेसएक्सचे पूर्ण लक्ष हे मंगळावर केंद्रित होते. मंगळावर मानवी वस्ती उभारण्याच्या दृष्टीने स्पेसएक्स अनेक कल्पनांवर काम करत होती. खुद्द इलॉन मस्क यांनी आमचे लक्ष चंद्रामुळे भरकटणार नसून आम्ही मंगळ हेच प्रमुख उद्दिष्ट ठेवल्याचे गेल्या वर्षीच्या जानेवारीत कबूल केले होते. मात्र अचानक या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी स्पेसएक्सच्या गुंतवणूकदारांना यापुढे स्पेसएक्स मंगळाऐवजी चंद्र मोहिमेवर आपले लक्ष आधी केंद्रित करेल असे आश्वासन दिले होते. इलॉन मस्क यांनी अचानक बदललेल्या या निर्णयामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बदललेल्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर बोलताना इलॉन मस्क म्हणाले की, मंगळावर मानवी वसाहत उभारण्यासाठी 20 वर्षांचा कालावधी लागेल, तर चंद्रावर हेच लक्ष आपण 10 पेक्षा कमी वर्षांत गाठू शकू. ते सांगतात की, सौर मंडळातील ग्रह एकाच रेषेत येतात, तेव्हाच मंगळाची मोहीम शक्य आहे आणि असा प्रसंग 26 महिन्यांतून एकदा येतो. या प्रवासाला 6 महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र चंद्रावर आपण दर दहा दिवसांनी मोहीम राबवू शकतो आणि त्याला फक्त 2 दिवसांचा प्रवास अवधी लागतो. अर्थात मंगळापेक्षा चंद्रावर मानवी वस्ती उभारणे हे अधिक वेगाने आणि सहजपणे करता येणे शक्य आहे.

अनेक नव्या प्रकल्पांच्या घोषणा करणे, त्यांची कालमर्यादा निश्चित करणे आणि नंतर ते प्रकल्प रेंगाळणे हे इलॉन मस्क यांच्या यापूर्वीच्या काही प्रकल्पांच्या बाबतीत अनेकदा घडलेले आहे. त्यामुळे त्यांच्या मून सिटीच्या घोषणेबद्दल अंतराळ विश्वातील तज्ञ सावधपणे प्रतिक्रिया देत आहेत. सरकारी अंतराळ संस्था या अनेक निर्णय सावधपणे आणि सावकाश घेतात. कारण त्या जनतेच्या पैशाने कारभार हाकत असतात. या उलट स्पेसएक्ससारख्या खासगी कंपन्यांवर असे कोणतेही दडपण नसल्याने त्या कोणताही निर्णय अधिक वेगाने आणि विश्वासाने घेऊ शकतात हा त्यांचा सर्वात मोठा फायदा आहे असेदेखील अनेक तज्ञ कबूल करतात.

इलॉन मस्क यांनी बघितलेले मून सिटीचे स्वप्न हे फक्त स्वप्न नसून ती खरे तर एक महत्त्वाकांक्षा आहे आणि ती टप्प्याटप्प्याने करत गेलेल्या विकासाने सत्यात अवतरू शकते असेदेखील मन अनेक शास्त्रज्ञांनी व्यक्त केले. मात्र इलॉन मस्क याने निश्चित केलेल्या कालावधीत हे स्वप्न सत्यात उतरणे अवघड असल्याचेदेखील अनेकांना वाटते. या विषयावर व्यक्त होताना अनेक अंतराळ शास्त्रज्ञांनी स्पेसएक्स कंपनीने चंद्राच्या मातीचे, तिथल्या नमुन्यांचे पुन्हा एकदा बारकाईने निरीक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले आहे. चंद्रावर उपलब्ध असलेली संसाधने आपण कशी वापरू शकतो आणि त्यासाठीची लागणारी यंत्रसामुग्री वाहून नेणे आणि चंद्रावर तिची स्थापना करणे हादेखील कळीचा मुद्दा ठरणार आहे.
चंद्रावर तळ स्थापन करणे शक्य झाल्यास त्या अनुभवाच्या आधारावर मंगळावर वस्ती स्थापन करणे अधिक सुलभ जाईल असा विश्वास काही शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. नासाच्या अपोलो 17 या 1972 साली यशस्वी ठरलेल्या मोहिमेनंतर आजवर कोणीही पुन्हा चंद्रावर पाय ठेवलेला नाही. सध्या जगभरात अनेक खासगी कंपन्या अंतराळ मोहिमांमध्ये स्वारस्य दाखवत आहेत. त्यातच अमेरिका आणि चीन यांच्यात चंद्रावर मानवाला उतरवण्यासाठी मोठी स्पर्धा सुरू असताना मस्क यांच्या या घोषणेने ही स्पर्धा अधिक रंगतदार होणार आहे हे नक्की.
[email protected]