
इराणचे लष्करप्रमुख अमीर हतामी यांना इस्रायलच्या हल्लात ठार करण्यात आले आहे,असा खळबळजनक दावा इस्रायलने केला आहे. इराणच्या लष्करी रणनीतीतील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींपैकी ते एक होते. अमीर हतामी यांना जून २०२५ मध्ये सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी कमांडर-इन-चीफ म्हणून नियुक्त केले होते. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्रायलने खळबळजनक दावा केला आहे. इस्रायली मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला आहे की इराणचे लष्करी प्रमुख अमीर हतामी हल्ल्यात मारले गेले आहेत. मात्र, इराणी सरकारने किंवा इस्रायली लष्कराने अधिकृतपणे हतामीच्या मृत्यूची पुष्टी केलेली नाही.
अमीर हतामी हे इराणच्या लष्करी रणनीतीतील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक मानले जातात. जून २०२५ मध्ये, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी लष्करी नेतृत्वात मोठा बदल केला आणि अमीर हतामी यांना इराणी सैन्याचे कमांडर-इन-चीफ (अर्तेश) म्हणून नियुक्त केले. हतामीच्या क्षमतेचे आणि अनुभवाचे कौतुक करून, खोमेनी यांनी त्यांच्यावर सैन्यात क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची जबाबदारी सोपवली. हतामी यांनी खमेनी यांचे लष्करी सल्लागार म्हणूनही काम केले आहे.
१९६६ मध्ये इराणच्या झांजन येथे जन्मलेल्या अमीर हतामीची लष्करी कारकीर्द अगदी लहान वयात सुरू झाली. अवघ्या १४ व्या वर्षी ते बसीज फोर्समध्ये स्वयंसेवक म्हणून सामील झाले. १९८० च्या दशकात त्यांनी इराण-इराक युद्धात सक्रिय सहभाग घेतला. मेजर जनरल हतामी यांनी २०१७ ते २०२१ पर्यंत राष्ट्राध्यक्ष हसन रूहानी यांच्या नेतृत्वाखाली इराणचे संरक्षणमंत्री म्हणून काम पाहिले. गेल्या दोन दशकांत पहिल्यांदाच नियमित सैन्यातील एखाद्या व्यक्तीला संरक्षणमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते. हे पद सामान्यतः रिव्होल्यूशनरी गार्ड्स (IRGC) च्या अधिकाऱ्यांकडे होते.
संरक्षण मंत्री म्हणून काम करताना, हतामीने इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन कार्यक्रमांना गती दिली. त्यांनी खोरमशहर आणि फतेह सारख्या प्रगत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या विकासाचे निरीक्षण केले. विरोधी गटांविरुद्ध ऑपरेशन मर्सद सारख्या मोठ्या ऑपरेशन्समध्ये हतामीने महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे लष्करात एक निर्भय योद्धा म्हणून त्यांची प्रतिमा स्थापित झाली. अमिर हतामी हे नेहमीच इराणच्या क्षेपणास्त्र-केंद्रित संरक्षण धोरणाचे कट्टर समर्थक मानले जातात. इराणच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी क्षेपणास्त्र शक्ती मजबूत करणे आवश्यक आहे असे त्यांचे मत आहे. या युद्धात त्यांच्या मृत्यूच्या बातम्या खऱ्या ठरल्या तर ते निश्चितच इराणसाठी एक मोठा धक्का असेल.

























































