खोटं पसरवून दिल्लीची सत्ता हिरावून घेतली गेली, केजरीवालांच्या निर्दोष सुटकेनंतर अखिलेश यादव यांचा भाजपवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीच्या कथित मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात राऊस अव्हेन्यू न्यायालयाने अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि बीआरएस नेत्या के. कविता यांच्यासह सर्व २३ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका केली आहे.

उत्तर प्रदेशमधील कन्नौज येथे पत्रकारांशी संवाद साधताना अखिलेश यादव यांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले की, खोटं पसरवून सत्ता हिरावून घेतली गेली. ते म्हणाले की, आज अखेर सत्याचा विजय झाला असून भाजपने रचलेले षडयंत्र उघडे पडले आहे. केवळ राजकीय द्वेषापोटी आणि विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी एका प्रामाणिक नेत्याला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विनाकारण तुरुंगात डांबण्यात आले होते, असा आरोप त्यांनी केला. केंद्र सरकार सीबीआय आणि ईडी सारख्या तपास यंत्रणांचा वापर करून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र न्यायव्यवस्थेने आज या प्रकरणातील दूध का दूध आणि पाणी का पाणी केले आहे, असेही यादव यांनी नमूद केले.

दरम्यान, न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले की, सीबीआयने सादर केलेले पुरावे या प्रकरणातील कट सिद्ध करण्यासाठी अपुरे आहेत. पुराव्यांच्या अभावामुळे सर्व २३ आरोपींना दोषमुक्त करण्यात आले. निकालानंतर अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर झाले होते. “मी भ्रष्ट नाही, मी कट्टर प्रामाणिक आहे, हे आज देशासमोर सिद्ध झाले,” अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.