
‘माझं शहर माझी जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत महापौर रुपाराणी निकम यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर महापालिकेतर्फे शुक्रवारी दिवसभर महास्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शहरातील प्रमुख रस्ते, दुभाजक आणि फुटपाथ साफसफाईत साचलेली खरमाती, तणकट तसेच अडथळा निर्माण करणारी झाडे-झुडपे असा 30 टनांहून अधिक कचरा संकलित करण्यात आला.
दरम्यान, महापौर, आयुक्त अशा पदाधिकाऱयांनी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. तर उपमहापौर अक्षय जरग यांनी स्वतः दुचाकीवरून रंकाळा परिसरात धूर फवारणीही केली.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तावडे हॉटेल येथील शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ महापौर रुपाराणी निकम व आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सभागृहनेते मुरलीधर जाधव व अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपस्थित होते. महापौरांनी शहरातील विविध भागांना भेट देत सेवाभावी संस्थांसमवेत प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. कावळा नाका येथे छत्रपती ताराराणी यांच्या पुतळ्याची पाण्याच्या पाइपद्वारे पाणी मारून स्वच्छता करण्यात आली. रंकाळा तलाव परिसरासह शहरात प्रवेश करणाऱया सर्वच प्रमुख मार्गांवर सायंकाळपर्यंत स्वच्छता मोहीम सुरू होती.
या मोहिमेत कोल्हापूर जिल्हा ऑप्टिकल वेल्फेअर असोसिएशन, हर्षवर्धन सामाजिक कल्याण संस्था, वृक्ष वल्ली संस्था, सावली केअर सेंटर, सावली सोशल सर्कल, रोटरी क्लबचे पदाधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी शहरातील विविध भागांत स्वच्छता उपक्रम राबविला. महास्वच्छता मोहिमेमुळे शहर स्वच्छ व सुशोभित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले असून, नागरिकांनी नियमितपणे स्वच्छता राखावी, असे आवाहन महापौरांनी केले.























































