
एकतर्फी प्रेमातून एक तरुण पत्नीला वारंवार त्रास देत असल्याने बदनामीच्या भीतीने पती-पत्नीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सोमनाथ पाटील व श्रीदेवी पाटील अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अभिषेक दत्तात्रय कोरे या तरुणाला अटक केली आहे. कोरे हा वासनांध तरुण असून, त्याच्यावर सांगोला येथे एक गुन्हा दाखल आहे. न्यायालयाने कोरे याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
मूळचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिर्पनहळ्ळी येथील सोमनाथ धानप्पा पाटील व श्रीदेवी सोमनाथ पाटील हे सध्या व्यवसायानिमित्त सोलापूर एमआयडीसीतील कलावतीनगर येथे आपल्या दोन मुलींसह राहत होते. कर्नाटक, विजयपूर येथील आरोपी अभिषेक दत्तात्रय कोरे हा विवाहित श्रीदेवी पाटील यांच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. याबाबत अभिषेक हा पती सोमनाथ यांना ‘तू तुझ्या बायकोला सोड, माझं तिच्यावर प्रेम आहे. तू जर तिला सोडलं नाही तर तुला मारून तिला पळवून नेईन,’ अशी वारंवार धमकी देत होता.
या धमकीला व बदनामीला घाबरून सोमनाथ पाटील व श्रीदेवी पाटील यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी दोघांनी सुसाईड नोट लिहिली असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अभिषेक दत्तात्रय कोरे (रा. विजयपूर, कर्नाटक) याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोरे याच्यावर सांगोला येथे एक बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी मल्लीनाथ पाटील यांनी फिर्याद दिली असून, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे तपास करीत आहेत. दरम्यान, दाम्पत्याच्या आत्महत्येने दोन मुली पोरक्या झाल्या असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






















































