
इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेतील युद्धामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक विमानतळ बंद करण्यात आली असून हजारो उड्डाणे रद्द करण्यात आली. यामुळे वेगवेगळ्या विमानतळावर, शहरात हजारो लोक अडकले आहेत. या युद्धाचा फटका आता क्रीडा विश्वालाही बसला असून, IPL गाजवलेला इंग्लंडचा स्टार क्रिकेटपटू जॉनी बेअरस्टो आपल्या संघासह संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये अडकला आहे. या तणावपूर्ण परिस्थितीत त्याने आपल्या देशाच्या पंतप्रधानांकडे मदतीची याचना केली आहे.
आखाती देशांची बिघडलेली सुरक्षा व्यवस्था पाहता, 1 मार्च रोजी होणारा ‘पाकिस्तान शाहिन्स’ आणि ‘इंग्लैंड लायन्स’ यांच्यातील 50 ओवरचा क्रिकेट सामना सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. जॉनी बेअरस्टो सध्या अबु धाबीमध्ये इंग्लंड लायन्स संघासोबत मार्गदर्शक म्हणून उपस्थित आहे. परिसरात झालेल्या भीषण स्फोटांमुळे खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. बेअरस्टोने सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांना तुम्ही आम्हाला सुरक्षित घरी पोहोचवू शकता का, असा सवाल केला आहे.
My statement on Iran. pic.twitter.com/Ki4VVTYO4N
— Keir Starmer (@Keir_Starmer) February 28, 2026
जॉनी बेअरस्टोच्या या आवाहनानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली असून त्याच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.अबु धाबीमध्ये वास्तव्यास असलेल्या खेळाडूंना स्थानिक प्रशासनाकडून मोबाईलवर सतर्कतेचे संदेश (Alerts) मिळाले आहेत. ज्यामध्ये घरातील खिडक्यांपासून दूर राहण्याचे आणि सुरक्षित इमारतींमध्ये आश्रय घेण्याचे निर्देश दिले आहेत. यावर इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) स्पष्ट केले आहे की, खेळाडूंची सुरक्षा ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता आहे. बोर्ड सध्या सुरक्षा तज्ज्ञ आणि सरकारशी सतत संपर्कात असून परिस्थितीचा आढावा घेत आहे.
कोण आहे जॉनी बेअरस्टो-
जॉनी बेअरस्टो (36) हा क्रिकेट विश्वातील एक मोठा चेहरा आहे. त्याने इंग्लंडसाठी 100 कसोटी सामने खेळले असून आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स सारख्या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएलमधील 52 सामन्यांत त्याने 1600 हून अधिक धावा केल्या आहेत. सध्या तो संघाबाहेर असला तरी क्रिकेटशी जोडलेला आहे.
























































