
धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधकाम करण्यासाठी अदानी उद्योग समूहाने धारावीत रेडीमिक्स प्लाण्ट उभारला आहे. त्यातून होणाऱया प्रदूषणामुळे धारावीकरांचा श्वास कोंडला असून हजारो नागरिक फुप्फुसाच्या जीवघेण्या विकारांनी त्रस्त झाले आहेत. धारावीत मनमानी चालू देत नाही म्हणून अदानींनी जीव घ्यायचे ठरवलेय का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. आश्चर्य म्हणजे या प्लाण्टविरुद्ध आवाज उठवणाऱ्या नागरिकांनाच पोलिसांच्या मारहाणीला सामोरे जावे लागत आहे.
धारावीतील शाहूनगर येथील डायमंड अपार्टमेंटच्या मागील बाजूस अदानी कंपनीने रेडीमिक्स काँक्रिटचा प्लाण्ट उभारला आहे. तिथून रेती-सिमेंटचे रेडीमिक्स धारावीच नव्हे तर मुंबईतील अदानी समूहाच्या बांधकाम साईटला पुरवले जाते. हा प्लाण्ट उभारल्यापासून धारावीची हवा प्रदूषित झाली आहे. सिमेंट आणि केमिकल्सचे कण वातावरणातून हवेद्वारे पसरून श्वसनावाटे धारावीकरांच्या शरीरात जात आहेत. मुंबईची हवा आधीच प्रदूषित झाली असताना अदानींच्या या प्लाण्टने त्यात आणखी भर घातली आहे. त्यामुळे धारावीकरांना श्वसनाचे आणि फुप्फुसाचे विकार जडले आहेत.
रेडीमिक्स प्लाण्टमध्ये निर्माण होणारे विषारी धुलीकण आसपास पसरून नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून नियमानुसार किमान 5 फूट आणि जास्तीत जास्त 20 फुटांचा बॅरिकेड्स उभारावा लागतो. त्याचप्रमाणे धूळ पसरू नये म्हणून पाण्याचा मारा करावा लागतो. मात्र हे सर्व नियम अदानी कंपनीने धारावीत पायदळी तुडवले आहेत. त्याचा त्रास गोरगरीब धारावीकरांना होत आहे.



























































