
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानमध्ये संतापाची लाट उसळली. कराचीतील अमेरिकन वाणिज्य दूतावासावर आंदोलकांनी हिंसक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे पडसाद आता अमेरिकेत उमटू लागले असून, पाकिस्तानमधील कट्टरतावादाचा दाखला देत अमेरिकेने पाकिस्तान्यांविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. अमेरिकेतील कार्यकर्त्या लॉरा लूमर यांनी थेट परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांना टॅग करत सर्व पाकिस्तान्यांचे व्हिसा आणि ‘ग्रीन कार्ड’ तात्काळ रद्द करण्याची मागणी सोशल मीडियावर केली आहे.
कराचीतील अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या अमेरिकन दूतावास परिसरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत सहा जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. लूमर यांनी आरोप केला की, इराणवरील अमेरिकन हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ‘पाकिस्तानी दहशतवाद्यांनी’ दूतावासावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांना अमेरिकन नौदलाने चोख प्रत्युत्तर दिले.
लॉरा लूमर यांनी पाकिस्तानवर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, ज्या देशाने ओसामा बिन लादेनला आश्रय दिला आणि जो देश अमेरिका व हिंदुस्थानच्या नागरिकांविरुद्ध हिंसाचाराला खतपाणी घालतो, त्या देशाच्या नागरिकांना अमेरिकेत स्थान असू नये. पाकिस्तानमधील कट्टरतावादाचा धोका लक्षात घेता, जोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत सर्व व्हिसा आणि कायमस्वरूपी वास्तव्याचा अधिकार देणारे ‘ग्रीन कार्ड’ निलंबित करणे अमेरिकेच्या सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
दरम्यान, अमेरिकन परराष्ट्र विभागाने व्हिसा रद्द करण्याच्या या मागणीवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
























































