
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांना कृषी साहित्य खरेदी घोटाळय़ात आज लोकायुक्तांनीही क्लीन चिट दिली. 2024 मध्ये मुंडे यांनी कृषिमंत्री असताना केलेल्या खरेदीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप होता. मुंबई उच्च न्यायालयाने त्या प्रकरणात मुंडे यांना आरोपातून यापूर्वीच मुक्त केले होते. आता लोकायुक्तांनीही न्यायालयाचा तो निर्णय कायम ठेवून मुंडे यांना दिलासा दिला.
मुंबई उच्च न्यायालयाने मुंडे यांना आरोपातून मुक्त केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लोकायुक्तांकडे धाव घेतली होती. लोकायुक्तांनीही उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आपण कोणताही निकाल देऊ शकत नाही, उच्च न्यायालयाचा आदेश लोकायुक्तांवर कायदेशीररीत्या बंधनकारक आहे, असे स्पष्ट करत दमानियांची तक्रार फेटाळून लावली. धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना त्यांच्या विभागाने कृषी साहित्य आणि खतांच्या खरेदीत घोटाळा केला. त्यामुळे सरकारी तिजोरीचे नुकसान झाल्याचा आरोप दमानिया यांनी केला होता.
भ्रष्टाचाराविरुद्ध लढा सुरूच ठेवणार
– अंजली दमानिया
लोकायुक्तांनी तक्रार फेटाळली असली तरी हा विषय सार्वजनिक हिताचा असून आपल्याकडे त्यासंदर्भात भक्कम पुरावे आहेत असा दावा करत भ्रष्टाचाराविरुद्ध लढा सुरूच ठेवणार असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला आहे.
























































