
पाटलीपुत्र एक्स्प्रेसने मुंबईच्या दिशेने जाणारा तरुण प्रवासी आज दुपारी कल्याण स्थानकावर उतरला खरा. पण पुन्हा गाडीत चढताना त्याचा तोल गेला आणि तो फलाट व गाडीच्या गॅपमध्ये अडकून थेट रेल्वे ट्रॅकवर पडला. मात्र एका दक्ष पोलिसाने धाव घेऊन प्रवासी व हमालांच्या मदतीने या प्रवाशाला सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. दिनेश मंगलाणी असे या प्रवाशाचे नाव असून त्याच्या पायाला व पाठीला मार लागल्याने रुग्णालयात दाखल केले आहे.
मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास पाटणहून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाणारी एक्स्प्रेस फलाट क्रमांक सहावर आली. या गाडीतून कुटुंबासह प्रवास करणारा दिनेश मंगलाणी हा पाण्याची बाटली आणण्यासाठी खाली उत्तरला. पाणी घेऊन पुन्हा एक्स्प्रेसमध्ये चढत असतानाच त्याचा तोल गेला व तो थेट गॅपमध्ये अडकून ट्रॅकवर उलटा पडला. जीवाच्या आकांताने तो ओरडत होता. त्याचवेळी रघुनाथ रणधीरे हे रेल्वे पोलीस ड्युटीवर जाण्यासाठी फलाटावर आले होते. ही घटना दिसताच क्षणाचाही विलंब न लावता रणधीरे हे स्वतःचा जीव धोक्यात घालून खाली उतरले व त्यांनी स्थानिक प्रवाशांच्या मदतीने दिनेशला मोठ्या प्रयत्नाने सुखरूप बाहेर काढले. दिनेशवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
























































