
शहरातील वाहतूककोंडी आणि रस्त्यांवरील वाढते अतिक्रमण हटवण्यासाठी संगमनेर नगरपरिषद अखेर
ऍक्शन मोडमध्ये आली असून, सोमवारी (दि. 2) सकाळपासून प्रमुख रस्त्यांवर धडक मोहीम सुरू करत अतिक्रमणे हटविण्यात आली. जेसीबीसह, पालिकेचे पथक आणि पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. यामध्ये अनेक ठिकाणची दुकाने, शेड, फलक आणि हातगाडय़ा हटवल्या.
अकोले बायपास, बस स्थानक परिसर, नवीन नगर रोड, तसेच बस स्थानक ते ऑरेंज कॉर्नर हा शहरातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग असल्याने येथे वर्षानुवर्षे वाढत चाललेले अतिक्रमण वाहतुकीसाठी मोठा अडथळा ठरत आहे. रस्त्यावरच फळांचे स्टॉल, नाश्त्याच्या टपऱया, हातगाडय़ा तसेच काही मोठय़ा व्यापाऱयांनी दुकानांचा विस्तार करून रस्ते अक्षरशः गिळंकृत केले होते. परिणामी वाहतूककोंडी, अपघाताचा धोका आणि नागरिकांची गैरसोय दिवसेंदिवस वाढत होती. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने काही दिवसांपूर्वी संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, नोटिसांकडे दुर्लक्ष केल्याने अखेर पालिकेने थेट कारवाईचा बडगा उगारत सोमवार सकाळपासून अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली. या कारवाईत अनेक मोठय़ा व्यापाऱयांवरही हातोडा पडला. शहरातील प्रसिद्ध कापड उद्योजक राजपाल मालपाणी उद्योग समूहाचे अतिक्रमणही पालिकेच्या पथकाने हटवले. त्यामुळे कारवाई सर्वांवर समानपणे होत असल्याचे चित्र दिसून आले.
दुसरीकडे या कारवाईमुळे गोरगरिबांमध्ये संतापाची लाट उसळली. अनेक वर्षांपासून हातगाडय़ा आणि छोटय़ा दुकानांवर उदरनिर्वाह करणाऱया नागरिकांनी आक्रोश व्यक्त करत, आमचा संसार उद्ध्वस्त करू नका, आमच्या पोटापाण्याचे काय, असा सवाल उपस्थित केला. न्यायासाठी आम्ही नगरपालिकेत धाव घेणार असल्याचेही दीपक साळुंखे यांनी सांगितले. काही ठिकाणी नागरिकांनी पालिकेविरोधात निषेधही नोंदवला.
दोन-तीन दिवस कारवाई सुरू राहणार – मुख्याधिकारी गोरे
पालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे म्हणाले, अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत नागरिकांना आधीच सूचना दिल्या होत्या. रिक्षाद्वारे घोषणा, सोशल मीडियावर सूचना, तसेच माध्यमांद्वारे माहिती देऊनच ही कारवाई करण्यात येत आहे. नवीन नगर रोड, अकोले बायपास, बी.एड. कॉलेज परिसर तसेच मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमित भागांवर टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाणार आहे. रस्त्यावर मार्ंकग करून त्या हद्दीत येणारे सर्व अतिक्रमण हटवण्यात येणार असून, ही मोहीम सलग दोन ते तीन दिवस सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
























































