इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाचा परिणाम; कोल्हापूर बाजारात ड्रायफ्रूट्स महागले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अमेरिका, इराण, इस्रायल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही त्याचे पडसाद उमटत आहेत. विशेषतः इराणकडून मोठय़ा प्रमाणात हिंदुस्थानात आयात होणाऱया वस्तूंची आवक थांबल्याने त्याचा किमतीवर परिणाम दिसून येत आहे. कोल्हापुरातही ड्रायफ्रूट्स बाजारावर त्याचे परिणाम दिसत असून, ड्रायफ्रूट्सचे दर महागले आहेत.

कोल्हापूरमध्ये मोठय़ा प्रमाणात खजूर, पिस्ता, बदाम, अक्रोड यांसारखे ड्रायफ्रूट्स मध्यपूर्वेतील देशांतून आयात केले जातात. युद्धजन्य परिस्थितीमुळे समुद्री वाहतूक, विमान खर्च आणि आयात प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी या ड्रायफ्रूट्सच्या दरात सध्या 10 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेषतः रमजान आणि आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खजूर, पिस्ता, बदाम, अक्रोड आदी ड्रायफ्रूट्सला मोठी मागणी असते; पण या युद्धामुळे सध्या मालाची आवक घटल्याने किरकोळ विक्रेत्यांना वाढीव दराने माल खरेदी करावा लागत आहे. काही व्यापाऱयांनी साठेबाजीची शक्यतादेखील नाकारलेली नाही. कोल्हापुरात किरकोळ ग्राहकांनाही याचा फटका बसत असून, सणासुदीच्या खरेदीवर याचा परिणाम दिसून येत आहे.

इराणवरून थेट कोल्हापुरात येणाऱया खजूर, पिस्ता, मामरा बदाम, शहाजीरा यांचे दर वाढल्यामुळे ग्राहक कमी प्रमाणात खरेदी करत आहेत. याचा परिणाम व्यापाऱयांवरही होत आहे. कोल्हापुरातील व्यापारी थेट इराणवरून माल खरेदी करत असतात. त्यामुळे मालाची आवक कमी झाली आहे, अशी प्रतिक्रिया येथील ड्रायफ्रूट्स व्यापारी गुलाम बेलिम यांनी दिली.

गेल्या महिन्यातील दर आणि आजचा दर पुढीलप्रमाणे ः

खजूर – गेल्या महिन्यातील दर 350 रुपये किलो. सध्याचा दर 450 रुपये प्रतिकिलो.

पिस्ता – गेल्या महिन्यातील दर 1800 ते 2000 रुपये प्रतिकिलो, सध्याचे दर 2500 ते 2650 रुपये प्रतिकिलो

मामरा बदाम – गेल्या महिन्यातील दर 3000 ते 3200 रुपये प्रतिकिलो होते. सध्याचा दर 4000 ते 4200 रुपये प्रतिकिलो आहे.

शहाजीरा – गेल्या महिन्यातील दर 800 रुपये प्रतिकिलो होता, तर आजचा दर 1200 रुपये प्रतिकिलो आहे.