
निसर्गरम्य माथेरानमध्ये सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटकांची तुफान गर्दी होते. मात्र यंदा शनिवार, रविवार जोडून होळी, धुळवडीची सलग तीन-चार दिवस सुट्टी असूनही माथेरानच्या बाजारपेठेत शुकशुकाट दिसत होता. येथील हिरवाईत सर्वत्र धुकं धुकं धुकं दिसत असले तरी ते पर्यटकांविना मात्र मुकं मुकं मुकं दिसत होतं. पर्यटकांनी पाठ फिरवल्याने हॉटेल तसेच अन्य व्यवसायावर परिणाम झाला आहे.
शनिवार, रविवार व धुलीवंदनाच्या लागोपाठ सुट्ट्या असतात तेव्हा माथेरानमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होते. यावेळी मात्र दहावी, बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षा तसेच नुकताच झालेला ई-रिक्षांचा संप यामुळे अनेकांनी माथेरानला जाण्याचा बेत रद्द केला. एरवी येथील बाजारपेठ, मिनी ट्रेन, टॅक्सी स्टॅण्ड येथे पर्यटकांची रेलचेल असते.
ई-रिक्षाची सुविधा असल्यामुळे आम्ही माला आली आहेत. मध्यंतरी बंद असल्याच्या बातम्या ऐकल्या होत्या. ई-रिक्षांची संख्या वाढवली तर कुणालाही ताटकळत उभे राहावे लागणार नाही. सध्या मात्र इथे नेहमीसारखी गर्दी दिसत नाही.
अंकुर मोकाशी, पर्यटक (मुंबई)
माथेरानमधील बहुतेक उद्योग हे पर्यटनावरच अवलंबून आहेत. विशेषतः नेरळहून माथेरानकडे जाणाऱ्या मिनी ट्रेनचे बच्चे कंपनीला आकर्षण असते. पण सध्या या ट्रेनमधून मोजकेच प्रवासी दिसत आहेत. माथेरानमधील शुकशुकाट बघून अनेकांना कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या ‘आजोबांच्या खोलीत आता धुकं धुकं धुकं’ या कवितेची आठवण आली. पर्यटकच न फिरकल्याने ‘माथेरानमध्ये धुकं धुकं धुकं.. पर्यटकांविना मुकं मुकं मुकं’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
सध्या हॉटेल व्यवसायात मोठी मंदी आहे. कामगारांचे पगार, वीज बिल, पाणी बिल आणि देखभाल खर्च भागवताना आर्थिक ताण जाणवत आहे.
मिलिंद कदम, व्यवस्थापक, (हॉटेल रंगोली)























































