25 लाख युजर्सनी चॅटजीपीटीचा वापर थांबवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सॅम ऑल्टमॅन यांच्या नेतृत्वाखालील ओपन एआय कंपनीला सध्या जगभरातील युजर्सच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागत आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाला त्यांचे एआय मॉडेल्स एका गुप्त सरकारी नेटवर्कवर वापरण्याची परवानगी दिल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे. पेंटागॉनसोबतच्या करारामुळे बहिष्कार मोहीम सुरू करण्यात आली असून 25 लाख युजर्संनी आपला चॅटजीपीटीचा वापर थांबवला आहे.

ओपन एआयने काही दिवसांपूर्वी पेंटागॉनसोबत एआय टेक्नोलॉजीला सुरक्षित यंत्रणांमध्ये वापर करण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी केली आहे. या निर्णयाला जोरदार विरोध झाला असून युजर्सनी कंपनीवर लष्करी कारवायांना मदत केल्याचा आरोप केला आहे.

बहिष्कार मोहिमेच्या वेबसाईटनुसार, इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्पर्ह्समेंट सोबतचे करार, ओपन एआयचे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनी एमएजीए इंकला दिलेली 25 दशलक्ष डॉलर्सची कथित देणगी आणि आता पेंटागॉनसोबत झालेल्या नव्या करारामुळे युजर्सनी सबस्क्रिप्शन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ओपनएआयने अद्याप सब्सक्रिप्शन रद्द करणाऱ्या युजर्सच्या अधिकृत आकडय़ाबद्दल कोणतेही जाहीर विधान केले नाही. युजर्सच्या नाराजीनंतर ओपन एआय काही बदल करणार का, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.