Sukhoi Crash – 28 वर्षांचा लेक गेला, नागपूरच्या दुरागकर कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; ऑपरेशन सिंदूरमध्येही बजावली भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हवाई दलाचे सुखोई-30 विमान गुरुवारी सायंकाळी आसाममध्ये दुर्घटनाग्रस्त झाले. यात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. स्क्वाड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरागकर अशी मृत्यू झालेल्या वैमानिकांची नावे आहेत. पूर्वेश दुरागकर हा केवळ 28 वर्षांचा असून महाराष्ट्रातील नागपूर येथील रहिवासी आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही पूर्वेशने महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.

पूर्वेशचे वडील रविंद्र दुरागकर हे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी आहेत. तरुण मुलाच्या निधनामुळे दुरागकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लहानपणापासूनच पूर्वेशला वायुसेनेत जाऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न होते. हिंदुस्थानी वायुदलात असल्याचा त्याला अभिमान होता, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. अपघाताच्या एक दिवस आधीच त्याचे कुटुंबाशी बोलणे झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्वेशच्या निधनाची बातमी आली.

मनमिळावू स्वभाव असलेला पूर्वेश देशसेवा सर्वात मोठा धर्म मानत असे. आसाममधील तेजपूर एअरबेसवर पूर्वेशची पोस्टिंग होती. तेजपूर एअरबेसच्या रनवेवर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने सध्या तो जोरहाटमध्ये तैनात होता. आसाममधील जोरहाटपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर सुखोई-30 हे लढाऊ विमान कोसळले. वायू दल आणि तपास यंत्रणा अपघाताच्या कारणांचा तपास करत आहेत. अपघात नेमका कसा झाला हे तपासाअंती उघड होईल.