
आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यात वीज वितरण कंपनीचा अजब कारभार समोर आला आहे. समरलाकोटा भागात एका बंद घराला तब्बल 1.99 कोटी रुपयांचे वीज बिल आकारले. बिल हाती येताच घरमालक हैराण झाला. समरलाकोटा येथील टिडको हाऊसिंग कॉलनीतील रहिवासी दसरी दुर्गा यांच्या नावावर हे बिल जारी करण्यात आले.
हा फ्लॅट बऱ्याच काळापासून बंद आहे, तिथे कोणीही राहत नाही, असे कुटुंबाने सांगितले. विजेचे बिल ऑनलाइन तपासल्यावर कुटुंबाला ही बाब कळली. बिल पाहून कुटुंबातील सदस्याने तात्काळ स्थानिक वीज विभागाच्या कार्यालयात धाव घेतली. वीत वितरण अधिकाऱ्यांना बिलाबाबत माहिती देत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
तक्रार मिळाल्यानंतर वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी मीटर आणि बिलिंग रेकॉर्ड तपासले. घरात नुकतेच एक नवीन वीज मीटर बसवण्यात आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे बिल चुकीच्या पद्धतीने जास्त दाखवण्यात आले, असे तपासादरम्यान अधिकाऱ्यांना आढळून आले.
ही पूर्णपणे तांत्रिक चूक होती. चौकशीनंतर बिलामध्ये दुरुस्ती करण्यात आल्याचे वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वीज विभागाने दसरी दुर्गा यांच्या नावाने एक नवीन आणि दुरुस्त केलेले बिल जारी केले. सुधारित बिलात वीज बिल फक्त 147 रुपये असल्याचे दिसून आले.





























































