आंध्रात दोनपेक्षा जास्त मुले जन्माला घातल्यास 25 हजार रुपये मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुले जन्माला घालणाऱ्या दांपत्याला आंध्र प्रदेश सरकार 25 हजार रुपये प्रोत्साहन रक्कम देणार आहे. ही घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली. राज्यात कमी झालेला जन्मदर पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. चंद्राबाबू नायडू यांनी विधानसभेत राज्याचे नवीन ‘लोकसंख्या व्यवस्थापन धोरण’ मांडले. राज्याचा प्रजनन दर 1.5 पर्यंत खाली घसरल्याने नायडू यांनी चिंता व्यक्त केली आहे. ज्या कुटुंबात दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या मुलाचा जन्म होईल, त्यांना प्रसवसमयी 25 हजार रुपयांचे रोख प्रोत्साहन देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

राज्यात जन्मदर कमी झाल्यामुळे भविष्यात तरुणांची संख्या घटून वृद्धांची लोकसंख्या वाढण्याची भीतीही नायडू यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर आणि मनुष्यबळाच्या उपलब्धतेवर होऊ शकतो. दक्षिणेकडील राज्यांची लोकसंख्या अशीच कमी होत राहिली तर भविष्यात लोकसभेतील प्रतिनिधित्वही कमी होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला. आकडेवारीनुसार, राज्यातील 58 टक्के कुटुंबांमध्ये सध्या केवळ एकच मूल आहे. मुख्यमंत्री नायडू म्हणाले की, राज्याचा विकास टिकवून ठेवण्यासाठी तरुणांची गरज आहे. जर जन्मदर वाढला नाही, तर शेती आणि उद्योगांसाठी कामगार मिळणार नाहीत.