
>> प्रसाद ताम्हनकर, [email protected]
जगावर युद्धाचे ढग गडद होत असताना जगातील काही महत्त्वाची शहरे पाण्याच्या संकटाशी झुंजत आहेत. महायुद्धाच्या भीतीत हे संकट काहीसे दुर्लक्षिले जात असले तरी लवकरच ते उग्ररूप धारण करणार आहे यात कोणतीही शंका नाही. हिंदुस्थानातील समुद्रकिनारा लाभलेल्या चेन्नईसारख्या शहरापासून ते जगाचे ब्रेड बटर म्हटल्या जाणाऱया ब्राझीलसारख्या देशापर्यंत अनेक ठिकाणी सध्या पाण्याची मोठी कमतरता भासत आहे.
ब्राझीलला जगाचे ब्रेड आणि बटर असे कौतुकाने म्हटले जाते. ब्राझीलच्या आग्नेय भागात 300 घन किलोमीटर पाणी घटल्याचे समोर आले आहे. हवामान बदलामुळे पूर आणि दुष्काळाच्या चक्रात मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर ब्राझील अन्नधान्याचा एक सर्वात मोठा उत्पादक असल्याने इथे शेतीसाठीदेखील पाण्याचा प्रचंड वापर केला जातो. त्यामुळे ब्राझीलमध्ये दुष्काळ पडल्यास संपूर्ण जगाची चिंता वाढते. झाडे ही जमिनीला पाणी शोषण्यासाठी मदत करतात. मात्र शेतीसाठी जमीन मोकळी करण्यासाठी इथे वर्षानुवर्षे झाडांची, जंगलांची बेसुमार कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे भूजल पातळी झपाटय़ाने घटली आहे.
अमेरिकेसारख्या महाशक्तीलादेखील काही राज्यांत पाण्याच्या कमतरतेचा सामना करावा लागतो आहे. मोठय़ा प्रमाणावर उभारली जात असलेली डाटा सेंटर या समस्येचे मूळ असल्याचे अनेक जलतज्ञ सांगतात. AI च्या वापरात प्रचंड मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीसाठी भव्य अशी डाटा सेंटर उभारली जात आहेत. या मोठय़ा डाटा सेंटरमधील अवाढव्य संगणक आणि इतर यंत्रसामग्रीला थंड ठेवण्यासाठी पाणी आणि वीज या दोन्ही गोष्टींची मोठय़ा प्रमाणावर आवश्यकता भासते. वीज निर्मितीसाठीदेखील पाण्याची आवश्यकता लागत असल्याने पाण्याचा दुप्पट वापर इथे करावा लागत असतो. एका अंदाजानुसार पुढील वर्षापर्यंत या उद्योगाला सहा अब्ज घनमीटर एवढय़ा पाण्याची आवश्यकता भासणार आहे.
चेन्नईसारख्या एकेकाळच्या सुखी शहरालादेखील पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. गेल्या काही दशकांत शहराचा विस्तार वेगाने वाढत गेला. चेन्नईमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणथळी जागा (वेट लॅंड्स) होत्या. त्यामुळे पाण्याची कधी कमी भासली नाही. मात्र वेगाने विस्तारत गेलेल्या या शहरात नेमक्या पाणथळी जागांवर रुग्णालये, मैदाने, भव्य शॉपिंग काम्प्लेस उभारली गेली आणि या जागांची पाणी शोषणाची मर्यादा घटत गेली. एका अभ्यासानुसार चेन्नईने आपल्या 65 टक्के पाणथळी जागा गमावलेल्या आहेत.
पाणी कमतरतेच्या या वाढत्या समस्येवर उपाय म्हणून सिंगापूरचा आदर्श घ्यावा असे अनेक तज्ञांचे मत आहे. सिंगापूरमध्ये स्वतचे असे गोडय़ा पाण्याचे कोणतेही स्रोत नाहीत. हा देश गोडय़ा पाण्यासाठी मलेशिया या देशावर अवलंबून असतो. यावर उपाय म्हणून इथे चार नळ (फोर टॅप्स) ही योजना राबवले गेली. एक म्हणजे मलेशिया ते सिंगापूर पाण्याची थेट लाइन, दोन म्हणजे जलाशयांमध्ये पावसाचे पाणी साठवण्याची विशेष व्यवस्था, तीन पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर पुनर्वापर आणि चौथा उपाय समुद्राचे खारट पाणी साफ करणे आणि त्याचा वापर करणे. इथले सरकार लोकांना पाणी बचतीसाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रोत्साहन देत असते आणि त्याच जोडीला पाण्याच्या वापरावर करदेखील लावण्यात आले आहेत. गेल्या दहा वर्षांत हे कर अनेकदा वाढविण्यातदेखील आलेले आहेत. जगातील सर्व देशांनी आता पाणी व्यवस्थापनाकडे गंभीरपणे बघण्याची आणि ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. थोडादेखील उशीर आता मोठय़ा संकटाला दिलेले आमंत्रण असेल.





















































