
व्हीएसआर कंपनीचा मालक व्ही. के.सिंग हा अजित दादांच्या दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत असणाऱया अनेकांपैकी एक आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडीकडून चौकशी सुरू आहे. त्यासाठी व्ही. के. सिंग याला बोलावलं होतं की पाहुणचारासाठी, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी ‘एक्स’ पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सिंग यांची आठ तास चौकशी केल्याचं सांगण्यात आलं, पण प्रत्यक्षात बहुतांश वेळ त्याची बडदास्त ठेवण्यात आणि पाहुणचार करण्यातच गेला. रात्री तर काळय़ा काचा लावलेल्या पोलिसांच्या गाडीतून पाहुण्याप्रमाणे त्याची पाठवणी केली गेली. यामागं काय काळंबेरं आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
कुणाच्या आशीर्वादाने व्हीआयपी ट्रीटमेंट?
एकीकडे आमचा हक्क असूनही या अपघाताबाबत एफआयआर पण नोंदवून घेतला जात नाही, पण दुसरीकडं ज्याच्या विमानाने अजित दादांना आपल्यातून हिरावून नेलं त्या व्ही. के. सिंगला मात्र कुणाच्या आशीर्वादाने व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते? याबाबतचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाही पोलीस अत्यंत चुकीची वागणूक देतात. अशा परिस्थितीत आता तरी अजितदादांसोबत काम केलेले आणि त्यांचे ‘विश्वासू’ सत्ताधारी आमदार जागे होतील का?, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.



























































