महाराष्ट्राचा झेंडा! 60 हून अधिक उमेदवार यशस्वी; जयसिंगपूरचा ऋषिकेश आलासे राज्यात अव्वल, ‘यूपीएससी’ परीक्षेत अनुज अग्निहोत्री देशात पहिला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) घेण्यात आलेल्या 2025च्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, राजस्थानचे डॉ. अनुज अग्निहोत्री यांनी देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या परीक्षेत महाराष्ट्राचा झेंडा डौलाने फडकला असून, 60 हून अधिक उमेदवार यशस्वी झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरचे ऋषिकेश आलासे यांनी 61वा रँक मिळवीत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. पहिल्या शंभरमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवार आहेत.

गुणवंतांमध्ये महाराराष्ट्रातील ऋषिकेश आलासे (61), आकाश त्रिवेदी (73), गौरव चोपडा (83), सायली पगार (87), दीक्षा पाटकर (88), अंकिता पाटील (140), कार्तिक बच्छाव (177), आदित्य उपाध्ये (154), उत्कर्ष पाठक (179), आदित्य पाठक (189), प्रतीक जोशी (196), राहुल पाटील (225), शुभम बेहेरे (226), ऋषिकेश पालीमकर (283), मोहिनी जगताप (323), हर्षवर्धन पाटील (349), हर्षवर्धन तिडके (355), कुणाल अहिरराव (430), अभिषेक मगदूम (449), धनश्री अहिरे (489), मनोज पाटील (493), नंदिनी पाटील (512), निखिल तांबे (517), श्रुती चव्हाण (527), साईराज पाटील (545), आरुषा पाटील (562), नीलेश माळी (553), जयदीप माळी (645), धनंजय दिघे (529) आदींचा समावेश आहे.

सालगडय़ाचा मुलाला 812 वी रँक

जालना जिह्यातील भोकरदन तालुक्यातील एका शेतमजुराचा मुलगा भिकन जगन रोजेकर याने यूपीएससीमध्ये मोठे यश मिळवले आहे. त्याने 812वी रँक मिळवली आहे. रँकिंगनुसार त्याला आयपीएस कॅडर मिळण्याची शक्यता आहे. त्याचे वडील हे एका शेतकऱयाकडे सालगडी म्हणून कामाला होते. आईदेखील शेतात मजुरी करायच्या. दोघेही निरक्षर. बेताची परिस्थिती असताना त्यांनी मुलांच्या शिक्षणात कुठेही कमी पडू दिले नाही.