मनतरंग- संसार सुखाचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या सौदागर

काही छोटय़मोठय़ा गोष्टींना गंभीर वळण येत नवरा बायकोचे नाते विषारी बनत जाते आणि त्याची परिणती मनं शेवटपर्यंत न जुळणे या वळणापर्यंत येऊन ठेपते. संसार आणि एकमेकांची साथ कायम ठेवायची असेल तर वेळीच योग्य पाऊल उचलायला हवे.

समीरला आता कुठे पहाटे झोप लागत होती तेव्हाच मेखलाचा (दोघांची नावं बदलली आहेत) हात त्याच्या खांद्यावर पडला आणि तो दचकून उठला. मेखला त्याच्या उशाशी बसली होती आणि त्याला उठवत होती. “काय आहे? रात्रभर भांडून, तमाशा करून मन नाही भरलं का तुझं?’’ समीर अपुऱया झोपेमुळे आधीच वैतागला होता.

“मला फक्त एवच म्हणायचं होतं की, आपण आता शांतपणे भांडणाचा विचार करू या. माझ्याकडून मी माफी मागते. तूही मला सॉरी बोल’’ असं तिने म्हणताच समीरची तळपायाची आग मस्तकात गेली, पण आता त्याला झोपेची गरज होती. दातओठ खात त्याने तिला “सॉरी’’ म्हटलं आणि पुन्हा कूस वळवून झोपला. तरीही मेखलाची बडबड सुरूच होती. हे आता नेहमीचं झालं होतं. मेखला कधी चिडेल, कधी रुसून बसेल हे अनिश्चित असायचं. त्यामुळे समीरला कायमच येणाऱया भांडणं आणि वादविवादांसाठी तयार राहावं लागायचं.

समीरने लग्नानंतर दोन वर्षांनी नोकरी सोडली आणि स्वतचा उद्योग सुरू केला. त्याला स्वतंत्रपणे राहायचं होतं आणि आवडीप्रमाणे काम करायचं होतं. त्यासाठी त्याने व्यवस्थित विचार करून उद्योगधंद्यात पाऊल टाकलं होतं. अर्थात त्याने मेखलाचंही मत घेतलं होतंच. मेखलाने अर्थात त्यावर आक्षेप घेतला नव्हता.

“मग आता का भांडणं वाआहेत तुमच्या दोघांची?’’ असा प्रश्न सत्रामध्ये त्या दोघांनाही विचारला गेला असता मेखला पटकन म्हणाली, “मला वाटलं होतं की, स्वतचा बिझनेस म्हणजे हा माझ्याबरोबरही वेळ घालवेल, पण कुठे काय?’’ असं म्हणताना तिच्या डोळ्यांत पाणी आलं.

समीर न राहवून ओरडला. “अहो मॅम, मी घर आणि व्यवसाय या दोन्ही बाजू सांभाळतोय, पण जेव्हापासून मी नोकरी सोडलीय तेव्हापासून मेखला माझ्यावर जरा जास्तच अवलंबून राहायला लागली आहे. तिच्या मते आता फॅमिली बिझनेस आहे म्हणजे तिच्यासाठीही मी कायम वेळ द्यायला हवा. पैसाही हवा तेवच. कसं जमेल मला?’’ त्याने मग सांगता सांगता सगळ्या घटना एक एक करून सांगितल्या.

मेखला ही लहानपणापासून तिच्या घरी लाडाकोडात वाहोती. त्यामुळे तिला पहिल्यापासून स्वतचं महत्त्व अधिक होतं. समीरच्या घरची परिस्थिती उलट होती. मध्यमवर्गीय कुटुंबात असलेल्या समीरचे जास्त लाड झाले नव्हते. लग्न झाल्यावर मेखलाला म्हणूनच एकत्र कुटुंब जमलं नव्हतं. निरुपाय म्हणून समीरने मनाविरुद्ध वेगळं बिऱहाड केलं. मेखलाच्या ‘काही वेगळं कर’ या अपेक्षेपायी त्याने स्वतंत्र उद्योग सुरू केला, पण मेखलाच्या अपेक्षा काही संपत नव्हत्या. तिच्या अपेक्षांची यादी ही दिवसेंदिवस वाच चालली होती. शॉपिंग करण्यासाठी, बाहेर फिरण्यासाठी तिला समीरची कंपनी लागायची.

“पण मला तुझी कंपनी आवडते’’ मेखला बोलण्याचा प्रयत्न करत होती. “…आणि तसंही या सगळ्या जबाबदाऱया तू पार पाडायला हव्या आहेस. माझ्या मैत्रिणींचे नवरे त्यांना सगळीकडे घेऊन जातात. आज पंधरा दिवस झाले, आपण हॉटेलिंग केलेलं नाही. माझ्या मैत्रिणींचे व्हॉट्सआप स्टेटस बघून मला जेलसी होते. त्या रात्री मी तुला म्हणूनच बोलले तर तू चिडलास. मॅम, नवरा म्हणून याची जबाबदारी…’’, पण स्वतची बाजू केविलवाणेपणाने मांडताना मेखलाची परिस्थिती दीनवाणी झाली होती.

खरं पाहता मेखलाला समजावणं गरजेचं होतं. कारण समीरवर सगळ्याच गोष्टी अवलंबून ठेवल्याने ती कमालीची आळशी झाली होती. समीरही सुरुवातीपासून तिच्या मनासारखं वागत होता. काहीशा आत्मकेंद्री, बेफिकीर, आळशी आणि सुखासीन असलेल्या मेखलाला समीरच्या या तब्येतीबद्दलही काही लक्षात येत नव्हतं. त्याची अपुरी झोप, खाणंपिणं कमी, कामाचा सतत ताण आणि घरी अशांतता यामुळे समीरचं मानसिक स्वास्थ्य बिघडत चाललं होतं आणि तो चिडचिडा, अशांत आणि नैराश्याच्या उंबरठय़ावर उभा होता. समीरही आता या सगळ्याला कंटाळला होता. त्याला खरोखर एका ‘स्पेस’ ची गरज होती.

बऱयाच वेळी नवरा बायकोच्या नातेसंबंधांमध्ये तिसरी बाजू म्हणजेच बाहेरच्या व्यक्ती (यात नवऱयाची किंवा बायकोची माणसे) जेव्हा कुठल्या ना कुठल्या प्रकारे करतात किंवा कोणाही एकाला लक्ष्य बनवतात त्या वेळी नवरा बायकोमध्ये हे अशा प्रकारचे वितुष्ट येऊ शकते. काही वेळा नवरा बायकोमध्येही सामंजस्य न राहता एकमेकांच्या नातेवाईकांबद्दलचा द्वेष, राग आपल्या जोडीदारावर काजातो आणि त्याला अपराधगंडामध्ये जखडून टाकतो. मग याचा परिणाम म्हणजे नवरा बायकोचे नाते हे विषारी बनत जाते आणि त्याची परिणती एकमेकांना टोमणे मारणे, इतरांसमोर अपमान करणे आणि मने शेवटपर्यंत न जुळणे या वळणापर्यंत येऊन ठेपते. यात मुलं असतील तर तीही भरडली जातात.

समीर आणि मेखलाच्या बाबतीत असंच घडत होतं. तिचा स्वतचा आत्मकेंद्री स्वभाव असल्याने दोघांचेही नाते जवळपास तुटण्याच्या मार्गावर होते, पण मेखलाला ‘आपलं काही चुकतंय का?’ ही जाणीव जशी झाली तसा तिने वैवाहिक समुपदेशनाचा पर्याय निवडला आणि समीरलाही तिने तयार केलं. दोघांचीही वैयक्तिक सत्रे सुरु झाली ज्यामध्ये एकमेकांबद्दलची चीड, हेवेदावे, त्यांची स्वतची एकमेकांबद्दलची मतं, अपेक्षा या त्यांना विचारल्या गेल्या. मेखलाच्या असणाऱया काही अवास्तव अपेक्षा तिलाच समीरच्या जागी बसवून विचार करायला लावल्या तेव्हा तिला ‘हे सगळं आततायी आहे’ ही जाणीव झाली. समीरलाही त्याच्या अपराधगंडातून बाहेर कागेले. त्याला हे समजावण्यात आलं की, भूतकाळात जे काही घडलं त्यामध्ये त्याचा वैयक्तिक दोष नव्हता. त्यामुळे दुसऱयाचे खापर विनाकारण डोक्यावर घेऊन त्याने स्वतला अजून त्रास (शिक्षा) करून घेऊ नये. सगळ्याच गोष्टी आपण हाताळू शकत नाही.

हळूहळू समीर आणि मेखलाला संसाराचा अर्थ कळू लागला होता. त्या दोघांनीही स्वतच्या वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रित केलं. आता दोघेही समाधानी आहेत आणि एकमेकांना सांभाळून घेत आहेत.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
[email protected]