चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला, महागड्या रो-रो फेरीकडे कोकणवासीयांची पाठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मत्स्यविकास व बंदर विकास विभागाने मोठा गाजावाजा करत मुंबई-विजयदुर्ग ‘एमटूएम’ रो-रो सेवा सुरू केली. चाळीस वर्षांनंतर बोटीने कोकणात जायला मिळणार म्हणून मुंबईकर कोकणवासीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पण रो-रो म्हणजे ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ झाला आहे. महागडया रो-रो सेवेकडे कोकणवासीयांनी पाठ फिरवली आहे. 636 आसन क्षमता असलेल्या रो-रोसाठी मोजून 20 ते 25 तिकिटांचेच बुकिंग होत असल्याचेही मनसेने म्हटले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) सोशल मीडियावरून या रो-रो सेवेचे पितळ उघडे पाडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बंदर विकासमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते 1 मार्च रोजी मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेचे उद्घाटन केले गेले. पण चारच दिवसांत 5 मार्च रोजी या रो-रोला विजयदुर्गजवळील समुद्रात अपघात झाला आणि त्या दिवशीची विजयदुर्ग-मुंबई फेरी रद्द करण्याची नामुष्की आली.

‘तब्बल 636 प्रवासी आणि 50 गाडय़ांची आसन क्षमता असलेल्या रो-रो बोटीतून प्रवासासाठी 5 मार्च रोजी अवघी 20 प्रवासी तिकिटे आणि 7 गाड्यांची बुकिंग झाली होती, हा भरघोस प्रतिसादच म्हणावा लागेल,’ अशी खिल्ली मनसेने ट्विटद्वारे उडवली आहे. ‘कोणाचेही ऐकून न घेता, कोणाशीही चर्चा न करता, कोणत्याही पूरक उपाययोजना न करता केवळ ‘गणेशोत्सव’ आणि ‘शिमगोत्सव’वेळी मीडियामध्ये चर्चेत राहण्यासाठी खटाटोप केला की हे असे होते!,’ असा टोलाही त्यात लगावण्यात आला आहे. ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला किती महसूल मिळवून देतो हे पुढील अर्थसंकल्पात दिसेलच,’ असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. त्याबरोबरच रो-रोचे दर व अन्य मार्गाने प्रवासाचे दर याची तुलनात्मक आकडेवारीही त्यात दिली आहे.

रो-रो नेमकी कुणासाठी? …दर बघा!

मुंबई ते विजयदुर्ग–4 माणसे आणि गाडी नेली तर 16 हजार रुपये खर्च. तिथून पुढे गावी जाण्यासाठी खर्च वेगळा.

रस्तामार्गाने कोकण प्रवास – 4 माणसे गाडीने विजयदुर्गला गेली तर 5500 रुपये खर्च.