
आखाती देशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एअर इंडियाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रवासातील स्थिरता आणि कनेक्टिव्हिटी टिकवून ठेवण्यासाठी कंपनीने युरोप, अमेरिका आणि आशियातील विविध शहरांसाठी 10 मार्चपासून 78 अतिरिक्त विमान फेऱ्या सुरू करण्याची घोषणा केली आहे.
इराण, इस्रायल आणि आसपासच्या देशांमधील संघर्षामुळे अनेक विमान कंपन्यांना आपले मार्ग बदलावे लागत आहेत किंवा उड्डाणे रद्द करावी लागत आहेत. या अनिश्चिततेच्या काळात प्रवाशांना सुरक्षित आणि खात्रीशीर प्रवासाचा पर्याय मिळावा, हा एअर इंडियाच्या या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.
एअर इंडियाने दिलेल्या निवेदनानुसार, 10 ते 18 मार्चदरम्यान अतिरिक्त विमान फेऱ्या चालवल्या जातील. त्यामुळे दोन्ही बाजूंनी नऊ मार्गांवर 17,660 सीट वाढतील.
कुठे आणि किती वाढणार फेऱ्या?
एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, या अतिरिक्त फेऱ्या प्रामुख्याने न्यूयॉर्क, लंडन (हिथ्रो), फ्रँकफर्ट, पॅरिस, अॅमस्टरडम, झुरीच, कोलंबो, माले अशा महत्त्वाच्या शहरांसाठी असतील. यामध्ये युरोपसाठी 25, उत्तर अमेरिकेसाठी 10 आणि आशियातील इतर देशांसाठी उर्वरित फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना युद्धाच्या सावटाखालीही विनाअडथळा प्रवास करणे शक्य होणार आहे.


























































