फेरफार, डिजिटल सातबारा, शैक्षणिक दाखले ऑन द स्पॉट; प्रलंबित कामांचा होणार गावपातळीवर निपटारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विविध शासकीय दाखल्यांसह महसूल विभागातील विविध कामांचा निपटारा आता गावपातळीवर होणार आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ या उपक्रमांतर्गत शहापूर तालुक्यात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. 15 मेपर्यंत ही शिबिरे होणार असून विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या शिबिरात विविध प्रकारचे दाखले ऑन दी स्पॉट मिळतील. तसेच महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित कामेदेखील मार्गी लावली जाणार आहेत.

फेरफार नोंदींचा निपटारा, सातबारा उताऱ्यावरील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा, आठ-अ वाटप, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेयर दाखले, अकृषिक (एनए) परवाना यासंदर्भातील मार्गदर्शन तसेच सनद प्रक्रियेची माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय सामाजिक अर्थसहाय्य योजनांच्या लाभांबाबत मार्गदर्शन, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक दाखले, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनासंदर्भातील तक्रारींचा निपटारादेखील केला जाईल.

येथे होणार उपक्रम

घरकुलासाठी पट्टेवाटप, ई-मोजणी अर्ज, शेतकऱ्यांसाठी अ‍ॅग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी, तसेच भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणांबाबत मार्गदर्शन अशा विविध सेवा या शिबिरांमधून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ही शिबिरे 9 मार्च (किन्हवली), 14 मार्च (आटगाव), 16 मार्च (शेणवा), 10 एप्रिल (वासिंद), 13 एप्रिल (डोळखांब), 17 एप्रिल (गोठेघर), 8 मे (खर्डी) व 15 मे (कसारा-बु.) येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत संबंधित मंडळ कार्यालयात होणार आहेत. नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अमित सानप व तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केले आहे.