इराण युद्धात महागाईचे तेल! अवघे जग इंधन टंचाईच्या संकटात!! कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या, प्रतिबॅरल 72 डॉलर्सवरून 110 डॉलर्सवर उसळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण युद्धात महागाईचे तेल ओतले गेले आहे. कच्च्या तेलाच्या किमतींनी मागच्या चार वर्षांतील उच्चांक गाठला असून बॅरलमागे 72 डॉलरवरून 110 डॉलरवर उसळी घेतली आहे. हल्ल्याच्या भीतीने आखातातील अनेक देशांनी थांबवलेले तेलाचे उत्पादन आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बंद झालेल्या वाहतुकीमुळे अवघे जग इंधन टंचाईच्या संकटात सापडले आहे. त्यामुळे जगातील तेलाचे संरक्षित साठे खुले करण्याची वेळ आली आहे. जी-7 राष्ट्रांचे नेतृत्व करणारे इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी तशी जाहीर भूमिका मांडली आहे. दरम्यान, अमेरिका-इराण युद्ध अधिकच पेटले आहे. मोजतबा खामेनी यांची इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड झाल्यानंतर इराण आणखी आक्रमक झाला असून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचे घनघोर हल्ले चढवले जात आहेत.

अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराणचे युद्ध तेलसमृद्ध आखाताच्या भूमीवर लढले जात आहे. त्याचा थेट फटका जगातील इंधन पुरवठय़ाला बसला आहे. अमेरिका-इस्रायलने इराणच्या तेलसाठय़ांना लक्ष्य केले आहे, तर प्रत्युत्तरादाखल इराणने अमेरिकेला मदत करणाऱ्या सौदी, कुवेत, यूएई, कतार, ओमान, जॉर्डन, इराक आदी देशांतील रिफायनरींना टार्गेट केले आहे. या सगळ्याचा परिणाम तेलांच्या किमतीवर झाला आहे. रविवारी कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल 120 डॉलरवर पोहोचले होते. मॅक्रॉन यांनी संरक्षित तेलसाठे खुले करण्याचे संकेत दिल्याने आज हे दर 110 डॉलरपर्यंत खाली आले.

तेहरानमध्ये तेलमिश्रित काळा पाऊस

अमेरिका व इस्रायलने तेहरानमधील पाच तेल डेपोंवर हल्ला केला. आगीमुळे व धुरामुळे तेथील हवा कमालीची प्रदूषित झाली आहे. सुमारे 1 कोटी लोकसंख्येच्या या शहरावर दाट आणि विषारी ढग पसरले आहेत. त्यामुळे आरोग्य आणीबाणी निर्माण झाली आहे. तेहरानमध्ये तेलमिश्रित काळा पाऊस पडल्याने श्वास घेणेही कठीण झाले आहे. हा प्रकार ऑसिडच्या पावसापेक्षा धोकादायक असल्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे.

शेअर बाजार गडगडला! 12 लाख कोटी बुडाले!!

इराण युद्धामुळे शेअर बाजारात सुरू झालेली पडझड सोमवारीही कायम राहिली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजार उघडताच निफ्टी आणि सेन्सेक्सची घसरण सुरू झाली. दिवसभरात सेन्सेक्स 2 हजार अंकांपर्यंत गडगडला तर निफ्टी 700 पेक्षा जास्त अंकांनी घसरला. दिवसअखेर काही प्रमाणात सावरत सेन्सेक्स 1352.74 घसरून 77566 वर बंद झाला तर निफ्टी 422.40 अंकांनी खाली येऊन 24028 अंकांवर बंद झाला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 12 लाख कोटींचे नुकसान झाले.

मोजतबांवर हल्ला, थोडक्यात बचावले

अयातुल्ला खामेनी यांच्या जागी इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून त्यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांची निवड झाली आहे. त्यांच्या नावाची घोषणा होताच इस्रायलने त्यांच्यावर हल्ला केला. मात्र, या हल्ल्यात मोजतबा थोडक्यात बचावले.

रशियाचा पाठिंबा

अमेरिका-इस्रायल विरुद्धच्या युद्धात रशियाने इराणला ठाम पाठिंबा दिला आहे. व्लादिमीर पुतीन यांनी  मोजतबा खामेनी यांचे अभिनंदनही केले. ‘खामेनी हे आपल्या वडिलांचा वारसा चालवतील आणि संकटाच्या काळात इराणी जनतेला एकत्र ठेवतील,’ असे त्यांनी नमूद केले.

चीन सावध

चीनने मात्र सावध भूमिका घेतली. ‘मोजतबा खामेनी यांची सर्वोच्च नेतेपदी झालेली निवड हा इराणचा अंतर्गत विषय आहे. त्यांच्या संविधानानुसार ही निवड झाली असून त्याचा आदर करायला हवा. अन्य देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणे चुकीचे आहे,’ असे चीनचे परराष्ट्र मंत्रालय म्हणाले.