
आयसीसी टी-20 वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असणारा अभिषेक शर्मा धावांचा पाऊस पाडणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र पहिल्या लढतीपासूनच बॅट त्याच्यावर रुसली आणि एक-एक धावासाठी त्याला झगडावे लागले. साखळीतील पहिल्या तीन लढतीत तर तो शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका होऊ लागली. या टीकेला अभिषेकने फायनलमध्ये आपल्या बॅटने उत्तर दिले.
रविवारी नरेंद्र मोदी मैदानात झालेल्या अंतिम लढतीत अभिषेक शर्मा याने फक्त 21 चेंडूत 52 धावा चोपल्या. या खेळी दरम्यान त्याने 6 चौकार आणि 3 उत्तुंग षटकार लगावले. अभिषेकने टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमधील सर्वात वेगवान अर्धशतकाची नोंद केली. त्याने अवघ्या 18 चेंडूत अर्धशतकाला गसवणी घातली. सोबत टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासातील तिसरे वेगवान अर्धशतकही त्याच्या नावावर नोंद झाले.
न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या या लढती अभिषेक शर्मा याने संजू सॅमसनच्या मदतीने हिंदुस्थानला विक्रमी सलामी दिली. दोघांनी पॉवरप्लेमध्ये तब्बल 92 धावांची लयलूट केली. टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हिंदुस्थानच्या नावावर जमा झाला. या वेगवान सलामीमुळे हिंदुस्थानला धावांचा डोंगर उभारता आला. परंतु अभिषेकने या धावा स्वत:च्या नाही तर टोटका म्हणून उधारीवर घेतलेल्या बॅटने चोपल्या.
फायनलमध्ये अभिषेक शर्मा याने स्वत:ची नाही तर मधल्या फळीत खेळणाऱ्या शिवम दुबे याची बॅट वापरली. अंतिम सामना संपल्यानंतर त्याने स्वत: याबाबत खुलासा केला. अंतिम लढतीत उतरण्यापूर्वी मी आज काहीतरी नवीन वेगळे करण्याचे ठरवले होते. मी शिवम दुबे याच्या बॅटने फलंदाजी केली. सकाळी मला वाटले की काहीतरी नवीन ट्राय करावे. गिल संघात नव्हता, त्यामुळे मी दुबेकडे गेलो आणि त्याची बॅट घेतली. तुझे खूप खूप आभार, असे अभिषेक शर्मा यावेळी म्हणाला.
तीनवेळा भोपळा
अभिषेक शर्मासाठी टी-20 वर्ल्डकप काही खास राहिला नाही. पहिल्या तीन लढतीत तो शून्यावर बाद झाला होता. त्यानंतरही टीम मॅनेजमेंटने त्याच्यावरील विश्वास कायम ठेवला. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध लढती त्याने अर्धशतक ठोकले, पण त्यानंतर वेस्ट इंडीज आणि आफ्रिकेविरुद्धही तो विशेष कामगिरी करू शकला नाही. याबाबत बोलताना तो म्हणाला की, गेल्या महिनाभरापासून मी खूप कठीण प्रसंगातून जात होतो. अशा काळात तुमच्या आजूबाजूला असलेली माणसं खूप महत्त्वाची ठरतात. जेव्हा माझ्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या, तेव्हाही संघातील सर्व खेळाडूंचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. ‘तो नक्कीच चांगली कामगिरी करेल’, असं ते नेहमी म्हणायचे.

























































