इंधन टंचाईच्या भीतीने एक-दोन नाही तर 524 सिलेंडर चोरीला, झाशीतील घटनेमुळे चिंतेचे वातावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. तेल आणि गॅस पुरवठ्यावर युद्धाचे भीषण परिणाम होत आहे. घरगुती गॅसचा टंचाई निर्माण होण्याची परिस्थिती असतानाच उत्तर प्रदेशातील झाशी येथून घरगुती गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रकच्या चोरीची एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकमधून अंदाजे 524 भरलेले एलपीजी सिलेंडर वाहून नेले जात होते. या सिलेंडरची किंमत अंदाजे 18 लाख रुपये आहे. ही घटना झाशीच्या सिपरी बाजार पोलिस स्टेशन परिसरात घडली. ट्रक मालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू केला आहे.

ट्रक मालक नीरज अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 मार्च रोजी प्लांटमधून 524 गॅस सिलिंडर एका ट्रकमध्ये भरण्यात आले होते आणि ते कानपूर देहातमधील गजनेर येथे नेण्यात येणार होते. होळी सणामुळे ट्रक चालक राजकुमार प्लांटबाहेर ट्रक पार्क करून घरी गेला. त्यानंतर 6 मार्च रोजी झाशीच्या बारागाव पोलीस स्टेशन परिसरातील परिछाजवळ महामार्गाच्या बाजूला ट्रक रिकामा उभा असल्याची माहिती मिळाली. ट्रक मालकाने जाऊन पाहिले असता ट्रकमधील सर्व गॅस सिलेंडर गायब होते आणि वाहनाचा जीपीएस तुटलेला होता. यानंतर ट्रक मालकाने तात्काळ सिपरी बाजार पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्हींचे फुटेज तपासत आहेत.