
आखातातील युद्धजन्य परिस्थिती कायम असून इस्रायल-अमेरिकेचे जोरदार हल्ल्यांनंतर देखील इराण मागे हटण्यास तयार नाही. याउलट हार्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग अजूनही त्यांनी रोखून धरला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चेतावणी देऊन देखील इराण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने विविध देशांची जहाजे अडकून पडलेली आहेत. याचा मोठा फटका हिंदुस्थानला बसत आहे.
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज ११ वा दिवस असून, याचे गंभीर पडसाद भारतीय व्यापारावर उमटू लागले आहेत. या संघर्षामुळे गल्फ कोऑपरेशन काउन्सिल (GCC) देशांना होणारी सुमारे ४० ते ५० अब्ज डॉलर्सची हिंदुस्थानी निर्यात धोक्यात आली आहे. तसेच, पश्चिम आशियातील तणावामुळे आखाती प्रदेशात हिंदुस्थानचे सुमारे ३.५ लाख कंटेनर्स अडकून पडल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.
या क्षेत्रांना बसणार मोठा फटका
या युद्धामुळे पेट्रोलियम उत्पादने, मौल्यवान धातू, रत्ने आणि दागिने (Gems & Jewellery) यांसारख्या प्रमुख क्षेत्रांना मोठा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय अन्नधान्य, प्रक्रिया केलेले अन्न, कापड आणि तयार कपड्यांच्या निर्यातीवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
निर्यात पूर्णपणे थांबलेली नाही, पण…
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्यात पूर्णपणे थांबलेली नाही, मात्र माल पोहोचण्यास विलंब होत आहे. जहाजांसाठी पर्यायी सागरी मार्गांचा वापर केला जात आहे. आखाती देश सध्या दबावाखाली असले तरी, हिंदुस्थानसोबतचे व्यापारी मार्ग खुले ठेवण्यासाठी ते उत्सुक आहेत. दरम्यान, अरबी समुद्र आणि ओमानच्या पाण्यात अडकलेली काही हिंदुस्थानची जहाजे पुढे जाण्यासाठी परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.
कोलकात्यात गॅस टंचाई; रेस्टॉरंट्स बंद होण्याची भीती
आखाती देशांच्या सागरी सीमांमध्ये अडकलेले कंटेनर्स बाहेर काढणे कठीण होत चालले आहे. याचा थेट परिणाम देशांतर्गत पुरवठ्यावरही होत आहे. मंगळवार सकाळपासून कोलकात्यात उद्योगासाठीच्या (Commercial) एलपीजी सिलिंडरचा पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे शहरातील रेस्टॉरंट्स आणि खाद्य व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून, अनेक रेस्टॉरंट्स बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.
तेहरानमध्ये पडला काळा विषारी पाऊस, नागरिकांना श्वास घेण्यासही त्रास
राजकीय तणाव वाढला
परिस्थिती अधिक चिंताजनक होत आहे, कारण इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर कालीबाफ यांनी मंगळवारी युद्धविरामाचा (Ceasefire) प्रस्ताव फेटाळून लावला. दुसरीकडे, संयुक्त अरब अमिरातीने (UAE) म्हटले आहे की, या युद्धात त्यांना ‘अनावश्यकपणे’ लक्ष्य केले जात आहे. युएईने स्पष्ट केले की, ते इराणवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्यात सहभागी होणार नाहीत. तथापि, इराणने आपल्या शेजारील अरब देशांवर हल्ले सुरूच ठेवले आहेत, कारण ते अमेरिकेचे मित्र राष्ट्र असल्याचे इराणचे मत आहे.
Iran Israel US war युद्ध कधी संपवायचे ते आम्ही ठरवणार! ट्रम्प यांच्या इशाऱ्याला इराणचे प्रत्युत्तर
तणाव वाढल्याने युएईने आपल्या तेल उत्पादनात दररोज ५ लाख ते ८ लाख बॅरल्सची कपात केली आहे, ज्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर आणखी भडकण्याची शक्यता आहे.
इराणच्या भूमिकेनंतर अमेरिका-इस्रायल एक पाऊलही मागे घेण्यास तयार नाहीत, तर इराणने हट्ट सोडला नाही तर आता पेक्षा 20 पटीने अधिक तीव्र असे हल्ले इराणवर करण्यात येतील असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिला आहे. तसेच इस्रायल देखील आणखी प्रखर हल्ल्यास तयार असल्याचे म्हणत आहे. यामुळे जागतिक अर्थ व्यवस्था अनर्थाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.

























































