Share Market News – ब्लॅक वेन्सडे ! सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला, निफ्टी 24 हजारांच्या खाली, ‘ही’ 4 मुख्य कारणं आली समोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगळवारी शेअर बाजारात चांगलीच तेजी दिसून आली होती. मात्र बुधवारी पुन्हा एकदा शेअर बाजार लालेलाल झाला. सुरुवातीला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी-50 ने ग्रीन सिग्नल दिला होता, मात्र अचानक विक्रीचा सपाटा सुरू झाल्याने बाजार कोसळला. सेन्सेक्स 1000 पेक्षा जास्त अंकांनी कोसळला, तर निफ्टीमध्येही 290 अंकांची मोठी घसरण पाहायला मिळाली.

बाजार कोसळण्याची 4 प्रमुख कारणे –

  • परदेश गुंतवणूकदारांनी विक्री सुरूच ठेवली आहे. 10 मार्च रोजी FII ने सुमारे 4673 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. घरगुती गुंतवणूकदारांनी खरेदीचा प्रयत्न केला, पण परदेशी विक्रीचा दबाव अधिक राहिला.
  • मागील सत्रात झालेल्या वाढीनंतर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेत ‘प्रॉफिट बुकिंग’वर भर दिला. तज्ज्ञांच्या मते, जागतिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सध्या जोखीम पत्करायला तयार नाहीत. विशेषतः बँकिंग क्षेत्रात मोठी पडझड झाली.
  • मध्य पूर्वेतील तणाव अजूनही कायम आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर होत असलेले हल्ले आणि दुसरीकडे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे ‘युद्ध लवकरच संपेल’ असे विधान, यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या भू-राजकीय अस्थिरतेचा परिणाम थेट बाजारावर झाला.
  • बाजार किती अस्थिर आहे हे दर्शवणारा ‘इंडिया व्हीआयएक्स’ (India VIX) निर्देशांक 8 टक्क्यांनी वाढून २20.5 वर पोहोचला आहे. जेव्हा जेव्हा VIX वाढतो, तेव्हा बाजारात मोठी पडझड होण्याची शक्यता असते.

दरम्यान, बाजारात आलेल्या या भूकंपामुळे एचडीएफसी बँक (HDFC Bank), ॲक्सिस बँक (Axis Bank) आणि बजाज फायनान्स यांसारख्या दिग्गज कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले. सेन्सेक्सच्या 30 प्रमुख शेअर्सपैकी तब्बल 22 शेअर्स लाल चिन्हात व्यवहार करत होते. तसेच बजाज फायनान्स, भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा आणि कोटक बँक यांसारख्या मोठ्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे.