इराण अजूनही 10 अणुबॉम्ब तयार करू शकतो, संयुक्त राष्ट्राच्या अणुनियंत्रण संस्थेच्या प्रमुखांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या अणुबाॅम्बबाबत आता जगाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. संयुक्त राष्ट्राच्या अणुनियंत्रण संस्थेचे प्रमुख राफेल ग्राॅसी यांनी एक मोठा इशारा दिला आहे. त्यांच्यामते इराणकडे अजूनही इतके युरेनियम आहे की, त्यापासून सुमारे 10 अणुबाॅम्ब तयार करु शकते. ग्राॅसी यांच्या म्हणण्यानुसार, इराणने युरेनियमचा मोठा साठा हा भूमिगत बोगद्यांमध्ये साठवला आहे. तसेच अजूनही काही भागांमध्ये युरेनियमचा साठा हा लपवण्यात आला आहे.

युद्ध सुरू होण्यापूर्वी इराणकडे 60 टक्क्यांपर्यंत युरेनियमचा साठा होता. एकूण युरेनियम हे 440 किलोग्राम इतके होते. हे युरेनियम शुद्ध केल्यास, त्यापासून अंदाजे 10 अणुबाॅम्ब तयार होऊ शकतात. सध्याच्या घडीला इस्फहान येथे सुमारे 200 किलोग्रॅम 60 टक्के शुद्ध युरेनियम असल्याचे निदर्शनास आले आहे.

आतापर्यंत मिळालेल्या उपग्रह प्रतिमांमध्ये इस्फहान येथील अणुसाहित्य इतरत्र हलवण्यात आल्याचे स्पष्ट संकेत मिळालेले नाहीत. काही संवर्धित युरेनियम नतांझ केंद्रातही असू शकते. तसेच, 2025 मधील हल्ल्यानंतर इराणने संयुक्त राष्ट्राच्या अणुनियंत्रण संस्थेला आपल्या अणुसाठ्याची संपूर्ण माहिती दिलेली नाही आणि आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना काही बॉम्बहल्ला झालेल्या अणुसुविधांची तपासणी करण्याची परवानगीही दिलेली नाही.

दरम्यान अमेरिकेने इराणचा अणुसाठा ताब्यात घेण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी, स्पेशल फोर्स मिशनचा विचार केल्याच्या चर्चा सुरू आहेत. हा साठा सुरक्षित राहिला तर तो मध्यपूर्वेतील युद्ध आणि जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका ठरू शकतो, असा इशारा आता तज्ज्ञांनी दिला आहे.