
कुलाबा मार्केट इमारतीमध्ये स्थलांतरित केलेल्या महापालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल येथे शिवसेनेने सरप्राईज व्हिजिट देऊन शाळेची पाहणी केली. या शाळेत सुमारे सोळाशे विद्यार्थी शिक्षण घेत असून मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड व उर्दू माध्यमातील वर्ग चालतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांची काही गैरसोय तर होत नाही ना याचा आढावादेखील घेण्यात आला.
मुंबई पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना योग्य, सुरक्षित आणि दर्जेदार शैक्षणिक वातावरण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या व शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर, स्वीकृत नगरसेवक व शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे यांनी आज ही सरप्राईज व्हिजिट दिली. यावेळी त्यांनी शाळेतील सर्व वर्गांची पाहणी केली, शिक्षक व विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला, विद्यार्थिनींना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांबाबत चर्चा केली.
सर्व वर्ग एकाच मोठ्या हॉलमध्ये घेतले जात आहेत. वर्गखोल्यांत मोकळी हवा व विजेची पुरेशी व्यवस्था नाही. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेबाबत अनेक तक्रारी. विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत स्वच्छतागृहांची संख्या अपुरी असल्याचे निदर्शनास आले.
पूर्वी ही शाळा ए. एन. सावंत मार्ग येथे असताना तेथे सुमारे दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र स्थलांतरानंतर अपुऱया सुविधांमुळे सुमारे चारशे विद्यार्थ्यांनी शाळा सोडली. या संदर्भात तत्काळ उच्च अधिकाऱयांशी चर्चा करून सर्व समस्यांवर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी करणार असल्याचे विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.




























































