भीमाशंकरमध्ये नियम झुगारून भाजप खासदाराला देवदर्शन! सामान्य भाविकांसाठी मात्र मंदिराचे दरवाजे बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे सुरू असलेल्या विकासकामांमुळे भाविकांना दर्शनासाठी गेल्या अडीच महिन्यांपासून मंदिराचे दरवाजे बंद आहेत. मात्र, झारखंडमधील भाजपचे वादग्रस्त खासदार निशिकांत दुबे यांना येथील प्रशासनाने पायघड्या घालत ‘व्हीआयपी दर्शना’ची व्यवस्था करून दिली. प्रशासनाच्या या दुजाभावामुळे सर्वसामान्य भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर येथील मंदिर व परिसरात विकास आराखडय़ानुसार सभामंडप व पायरीमार्गाचे  काम सुरू आहे. या कामांमुळे 9 जानेवारीपासून जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाने मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. मंदिरात महाशिवरात्रीची शासकीय पूजा सोडून अदयापर्यंत कोणत्याही भाविकांसाठी व नागरिकांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात आले नाही. हजारो किलोमीटर पायी वारी करून आलेल्या भाविकांनासुध्दा दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात आले नाही. राज्याच्या कानाकोपऱयातून येणाऱया भाविकांनाही मंदिर प्रवेश तर दूरच, पण साधे कळसाचेही दर्शन घेऊ दिले जात नाही. एकीकडे सर्वसामान्य भाविकांना मंदिराचे दरवाजे बंद असताना झारखंडमधील भाजपचे खासदार डॉ. निशिकांत दुबे यांना मात्र ‘व्हीआयपी सेवा’ देण्यात आली. खासदार दुबे भिमाशंकरला हेलिकॉप्टरने आले होते. त्यांच्यासाठी मंदिर खुले करून व्हीआयपी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. या प्रकारामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान ‘या प्रकाराबद्दल आपल्याला काहीही माहीत नाही,’ असे सांगत मंदिराचे अध्यक्ष जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हात वर केले. त्यामुळे मंदिर प्रशासनाने कोणाच्या दबावाखाली दुबेंसाठी मंदिराचे दरवाजे उघडले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.