West Bengal Election 2026 – TMC ने उमेदवारांची यादी केली जाहीर, ममता बॅनर्जी भवानीपूरमधून निवडणुकीच्या रिंगणात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमध्ये सत्तेची हॅट्ट्रिक गाठल्यानंतर आता २०२६ च्या विधानसभा निवडणुकीसाठी टीएमसी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्यानंतर तृणमूल काँग्रेसने आपली पहिली उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत 291 उमेदवारांची नावे जाहीर केले असून यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याही नावाचा समावेश आहे. त्या भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने या जागेवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांना उमेदवारी दिल्याने ही लढत अत्यंत चुरशीची ठरणार आहे.

यावेळेसच्या यादीत ममता बॅनर्जी यांनी मोठ्या प्रमाणावर फेरबदल केले असून, सुमारे ५० ते ६० विद्यमान आमदारांना नारळ देण्यात आला आहे. त्यांच्या जागी तरुण नेतृत्व आणि सांस्कृतिक क्षेत्रातील लोकप्रिय चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रसिद्ध गायिका इमान चक्रवर्ती, अभिनेत्री पारनो मित्रा आणि अभिनेता परमब्रत चटर्जी यांचा समावेश आहे. तसेच पक्षाचे तरुण नेते देबांशु भट्टाचार्य आणि त्रणांकूर भट्टाचार्य यांच्यावरही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, बंगालमध्ये यंदा दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील १५२ जागांसाठी २३ एप्रिल २०२६ रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी २९ एप्रिल २०२६ रोजी मतदान होईल. तर निकाल ४ मे २०२६ रोजी जाहीर होणार आहे.