हिमाचलमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांवर ‘ड्रेस कोड’चे बंधन; जीन्स-टीशर्टवर बंदी, वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिमाचल प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता पेहरावाचे कडक नियम लागू करण्यात आले असून, कार्यालयांमध्ये जीन्स आणि टी-शर्ट घालण्यावर राज्य सरकारने पूर्णपणे बंदी घातली आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले आहेत. सरकारी कार्यालयांमधील व्यावसायिक शिस्त आणि कार्यालयीन मर्यादा जपण्यासाठी हा पाऊल उचलण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या नवीन नियमावलीनुसार, सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आता केवळ औपचारिक (Formal) कपड्यांमध्येच कार्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे. पुरुष कर्मचाऱ्यांसाठी शर्ट-पँट किंवा ट्राउझर आणि कॉलर असलेले शर्ट अनिवार्य करण्यात आले असून, त्यासोबत शूज किंवा सँडल वापरणे बंधनकारक आहे. महिला कर्मचाऱ्यांसाठी साडी, फॉर्मल सूट, सलवार-कमीज, चुडीदार किंवा ट्राउझर-शर्ट असा पेहराव निश्चित करण्यात आला आहे. जीन्स, टी-शर्ट किंवा इतर कोणत्याही प्रकारचे अनौपचारिक आणि अशोभनीय कपडे घालून कार्यालयात येण्यास मनाई करण्यात आली आहे.

ड्रेस कोडसोबतच कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबतही सरकारने अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक सोशल मीडिया अकाऊंटवरून सरकारच्या धोरणांवर कोणतीही टीकात्मक किंवा अनधिकृत टिप्पणी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच अधिकृत सरकारी कागदपत्रे किंवा माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करणे हा नियमभंग मानला जाईल. जर एखाद्या कर्मचाऱ्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.