
लक्ष्मीचा वरदहस्त लाभलेल्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेचा 19 वा हंगाम सुरू होण्यापूर्वीच या जगातील लोकप्रिय लीगमध्ये मोठय़ा आर्थिक उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. 28 मार्चपासून सुरू होणाऱया या स्पर्धेतील राजस्थान रॉयल्स संघ विकायला काढला आहे. या संघाची सध्याचे बाजारमूल्य सुमारे 1.1 ते 1.35 अब्ज डॉलर (अंदाजे 9,000 ते 12,000 कोटी रुपये) इतके आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या फ्रेंचायझीसाठी तब्बल 11,956 कोटी रुपयांची बोली लागली असून ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठय़ा सौद्यापैकी एक ठरू शकते.
राजस्थान रॉयल्सवर गुंतवणूकदारांची नजर
सध्या राजस्थान रॉयल्स ही गुंतवणूकदारांसाठी मोठे आकर्षण ठरत असून, किमान तीन मोठय़ा गुंतवणूकदारांनी बाइंडिंग बोली सादर केल्याची माहिती आहे. यात आदित्य बिर्ला ग्रुप हा आघाडीवर असून, त्यांनी अमेरिकन गुंतवणूकदार डेव्हिड ब्लित्झर यांच्यासोबत भागीदारी करत मजबूत दावा सादर केला आहे. सुरुवातीला संघाच्या काही भागाच्या विक्रीचा विचार होता, मात्र आता योग्य किंमत मिळाल्यास संपूर्ण फ्रेंचायझी विक्रीचाही पर्याय खुला ठेवण्यात आला आहे.
सध्या राजस्थान रॉयल्स संघाचे मालकी हक्क इमार्ंजग मेडिया लिमिटेड (65 टक्के), रेडबर्ड कॅपिटल पार्टनर (15 टक्के) आणि लचलन मुर्डोच (13 टक्के) यांच्याकडे विभागलेले आहेत. उर्वरित हिस्सा इतर गुंतवणूकदारांकडे असून संपूर्ण विक्रीसाठी सर्वांची संमती आवश्यक आहे.
मोठ्या नावांची स्पर्धा
या व्यवहाराचे व्यवस्थापन द रैने ग्रुप करत असून त्यांनी यापूर्वी चेल्सी एफसी आणि मँचेस्टर युनायटेडसारख्या मोठय़ा क्लब्सच्या विक्रीत भूमिका बजावली आहे. राजस्थान रॉयल्स खरेदीच्या शर्यतीत टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, काप्री ग्लोबल तसेच काल सोमानी (रोब वाल्टन यांच्या सहकार्याने) यांचाही समावेश आहे.






























































