
लडाखला पर्यटनासाठी गेलेल्या पुण्याच्या तीन मित्रांचा राजस्थानमध्ये अपघाती मृत्यू झाला. कोटा येथील बालापुराजवळ दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर बुधवारी दुपारी ही घटना घडली. एक भीषण रस्ते अपघात घडला, ज्यामध्ये कारमधून प्रवास करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, वाहन पूर्णपणे चक्काचूर झाले आणि घटनास्थळी एकच गोंधळ व भीतीचे वातावरण निर्माण झाले.
कुणाल किरण चोरडिया (21), मयुरेश पांडुरंग पाडळे (21) आणि सिद्धांत रमेश आल्हाट (21) अशी मयत तरुणांची नावे आहेत. तिघेही पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडचे रहिवासी आहेत. तिघेही 26 फेब्रुवारी रोजी एका ग्रुपसोबत लेह-लडाख येथे पर्यटनासाठी गेले होते. पर्यटनाचा आनंद घेऊन फॉरच्युनर एसयूव्ही कारने ते घरी परतत असताना वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालापुरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या थुमडा गावाजवळ हा अपघात झाला. अतिवेगामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजक तोडून थेट 30 फूट खोल कोसळली. अपघात इतका भयंकर होता की कारचा चक्काचूर झाला. कारमधील तीनही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि रुग्णवाहिकेला पाचारण केले. स्थानिकांच्या मदतीने वाहनात अडकलेल्या तरुणांना बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी तीनही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले.




























































