
सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी, सुरक्षा प्रमुख लारीजानी यांच्यानंतर इस्रायली हल्ल्यात आता गुप्तचर मंत्री ठार झाल्याने इराण चवताळला आहे. ‘आरपार’ची भाषा करत इराणने आखातातील तेल व गॅस प्रकल्प उडवून देण्याची धमकी दिली आहे. हे प्रकल्प तत्काळ खाली करण्याचा इशाराही त्यांनी सौदी, कतार आणि यूएईला दिला आहे. त्यामुळे तेल आणि गॅसचा तुटवडा वाढण्याची शक्यता असून मोठे वांदे होणार आहेत.
केवळ लष्करी हल्ले करून इराणला नमवणे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने अमेरिका-इस्रायलने इराणचे नेतृत्व संपवण्याचा सपाटा लावला आहे. खामेनी यांच्यानंतर लारीजानी यांनाही मारण्यात आले. त्यानंतर बुधवारी इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खातिब यांचा इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाला. तसेच इराणच्या अत्यंत महत्त्वाच्या साऊथ पार्स गॅस प्रकल्पावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर इराण अधिकच आक्रमक झाला असून अमेरिकेची मोठी गुंतवणूक असलेल्या आखाती देशातील तेल व गॅस प्रकल्पांवर हल्ल्याची तयारी चालवली आहे. यूएईतील अल् होस्न गॅस फिल्ड, कतारची रास लफान रिफायनरी, सौदीतील अल जुबैल पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स, मसैद होल्डिंग, समरेफ रिफायनरीला टार्गेट केले जाणार आहे.
‘नाटो’ देशातील मतभेद विकोपाला
इराण युद्धावरून ‘नाटो’ देशातील मतभेद विकोपाला गेले आहेत. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेची मदत करण्यास फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ठाम नकार दिला आहे. ‘इराण युद्धाशी आमचा संबंध नाही. त्यामुळे कुठल्याही मोहिमेत फ्रान्स सहभागी होणार नाही. जेव्हा वातावरण शांत होईल तेव्हा पाहू,’ असे मॅक्रॉन म्हणाले. त्यावर ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला. ‘नाटो’मधील आमचे मित्र मूर्खपणा करत आहेत. ते आम्हाला मदत करू इच्छित नाहीत. मॅक्रॉन फार दिवस पंतप्रधान पदावर राहणार नाहीत, असा संताप ट्रम्प यांनी व्यक्त केला.
अमेरिका आणि इस्रायलला अजूनही इराण कळलेला नाही. एका माणसाच्या असण्यानं किंवा नसण्यानं आम्हाला फरक पडत नाही. प्रत्येक माणसाचं स्वतःचं महत्त्व असतंच. काहीचं जास्त, काहीचं कमी असतं. पण आमची ताकद राजकीय व्यवस्थेमध्ये आहे. इराणची राजकीय, सामाजिक व आर्थिक बांधणी मजबूत आहे. ती कोणीही हलवू शकत नाही. आमच्याकडं सर्वोच्च नेत्यापेक्षा मोठं कुणीही नसतं. तेही शहीद झाले, पण व्यवस्थेनं काम सुरूच ठेवलं. नवा नेता आला. त्यामुळं असे कितीही मारले गेले तरी इराण थांबणार नाही.’
अब्बास अराघची, परराष्ट्र मंत्री, इराण
धक्क्यांसाठी तयार राहा!
इराणने लारीजानी यांच्या हत्येचा निर्णायक बदला घेण्याची धमकी ट्रम्प यांना दिली आहे. आणखी धक्के प चवण्यासाठी तयार राहा, असा इशारा इस्लामिक रिव्होल्युसनरी गार्ड कॉर्प्सचे प्रमुख अली अब्दोल्लाही यांनी दिला आहे.
बुधवारी काय घडले?
– बगदादमधील अमेरिकी दूतावासावर इराणचा ड्रोन आणि रॉकेट हल्ला
– रशियाकडून लारीजानी यांच्या हत्येचा निषेध
– इराणच्या भूमिगत क्षेपणास्त्र तळांवर अमेरिकेने टाकला दोन हजार किलोचे बॉम्ब.

























































