
>> दिवाकर शेजवळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्यावर उभारलेल्या समता संगराचा शताब्दी महोत्सव आजपासून राज्यात सुरू होत आहे. नवी मुंबईतील खारघरचे ‘सत्याग्रह कॉलेज’ हे त्या ऐतिहासिक समता संगराचे ‘शैक्षणिक’ स्मारक ठरले आहे. कारण कोकणातील रायगड जिल्हा सत्याग्रह भूमी मानला जातो.
भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांना सोबत घेऊन महाडच्या चवदार तळ्यावर सामूहिकरीत्या केलेली पाणी प्राशन करण्याची कृती ही प्रतीकात्मक होती. शस्त्रशास्त्रांपासून वंचित ठेवलेल्या अस्पृश्य समाजाचे मूलभूत मानवी अधिकार आणि प्रतिष्ठsसाठी तो एल्गार होता. महाडात 99 वर्षांपूर्वी सुरू झालेला लोकशाही मूल्यांच्या प्रस्थापनेचा तो लढा यापुढेही निरंतर सुरू राहणार आहे. मात्र तो विधायक निर्मिती आणि संघर्ष या दोन्ही पातळ्यांवर पुढे जाण्याची गरज आहे.
महाडच्या ऐतिहासिक समता संगरामुळे कोकणातील रायगड जिल्हा ही सत्याग्रह भूमी ठरली आहे. त्या समता संगराच्या स्मृती जपण्यासाठी मराठवाडय़ातील ‘राहुल शिक्षण प्रसारक मंडळ’ या संस्थेने शैक्षणिक कार्यासाठी रायगड जिह्याची निवड 35 वर्षांपूर्वी केली होती. नवी मुंबईमध्ये 1991 पासून या संस्थेने शैक्षणिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर हे तिचे संस्थापक – संचालक आहेत. खारघरच्या सेक्टर 19 आणि 7 मधील नामांकित ‘सत्याग्रह कॉलेज’ हे त्या संस्थेची ओळख ठरले आहे.
राहुल शिक्षण प्रसारक मंडळ ही शिक्षण संस्था हैदराबाद मुक्ती संग्रामातील राज्य सरकारचा सन्मान प्राप्त झालेल्या स्वातंत्र्य सेनानींच्या योगदानातून साकार झालेली आहे. मराठवाडय़ातील स्वातंत्र्य सेनानींनी 1981 सालात लातूर येथे स्थापन केलेली ही संस्था सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट आहे. ‘सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण’ हे संस्थेचे ब्रीदवाक्य असून शिक्षणातून सामाजिक न्याय व सबलीकरण हे तिचे उद्दिष्ट आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या मूल्यांशी बांधिलकी मानणारी ही संस्था संविधानाला अभिप्रेत असलेल्या भावी पिढ्यांची जडणघडण करण्यासाठी कार्यरत आहे. त्यातून ‘सत्याग्रहीं’च्या भावी पिढ्यांची निर्मिती होत आहे.
उज्ज्वल शैक्षणिक वाटचाल केलेली ही शिक्षण संस्था भूखंड प्राप्तीसाठी आवश्यक त्या गुणवत्तेचे, पात्रतेचे निकष पूर्ण करत होती. तरीही या संस्थेला भूखंडाची प्राप्ती ही काही सहजासहजी झालेली नाही. 25 वर्षे सरकार दरबारी सातत्याने विनंती, मागणी, पाठपुरावा करण्यात गेली. अखेरीस सिडको प्रशासनाकडे दाद मागण्यासाठी विद्यार्थी आणि पालक हितचिंतकांचे आंदोलन करण्याची वेळही या संस्थेवर आली, पण न्याय्य मागणीवरच्या या लढय़ात जिद्द न हरल्यामुळे या संस्थेला अखेर यशप्राप्ती झाली आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आपल्या संस्थेच्या पूर्णतः मालकीची स्थावर मालमता उभारण्यात हातखंडा होता. राहुल शिक्षण प्रसारक मंडळ ही बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकत वाटचाल करणारी एकमेव संस्था ठरली आहे. तिचे स्वतः च्या मालकीच्या भूखंडांवर दिमाखदार सात मजली शिक्षण संकुल खारघरच्या सेक्टर 33 मध्ये आता वेगाने उभे राहत आहे. त्याला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त नांदेडचे डॉ. एस. पी.गायकवाड यांनी नुकतीच एकत्र भेट देऊन संस्थेच्या वाटचालीचे काwतुक केले आहे.
राहुल शिक्षण प्रसारक मंडळाचा गेल्या अडीच दशकांत विस्तारलेला शैक्षणिक पसारा मोठा आहे. त्यात चार महाविद्यालये, राज्य सरकार आणि सीबीएसई बोर्डाची मान्यता असलेली सहा इंग्रजी, सेमी इंग्रजी हायस्कूल, आश्रमशाळा यांचा समावेश आहे. तसेच या संस्थेची प्रत्येकी 60 विद्यार्थ्यांची निवासी क्षमता असलेली तीन हॉस्टेलही आहेत.
सध्या चार हजारांहून अधिक विद्यार्थी दरवर्षी या संस्थेत शिकत आहेत. त्यांच्यासाठी 165 हून अधिक समर्पित शिक्षक, प्राध्यापक आणि कर्मचारी कार्यरत आहेत. कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिह्यांत या संस्थेने दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे लोकप्रियता आणि लौकिक प्राप्त केला आहे. संस्थेच्या अजिंठा इंटरनॅशनल हायस्कूलनेही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जागतिकीकरणात पारंपरिक अभ्यासक्रम कालविसंगत ठरले आहेत. संगणक युगात अनुरूप असे उच्चशिक्षित, प्रशिक्षित, व्यावसायिक मनुष्यबळ ही तीव्र निकड बनली आहे. त्यादृष्टीने बदलत्या काळाची आव्हाने पेलणाऱ्या सक्षम पिढीच्या निर्मितीसाठी या संस्थेत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण दिले जात आहे. त्यात अर्थशास्त्र, वाणिज्य व्यवस्थापन, संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, विमा, व्यापार, कायदा, हॉस्पिटॅलिटी स्टडीज, शिक्षणशास्त्र, मल्टिमीडिया, अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेली पाली भाषा आणि जागतिक व्यवहाराची इंग्रजी भाषा अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे. व्यवस्थापन कोटय़ातील जागांना कमाईचे साथन न बनवता त्या जागांवर गुणवत्ताधारक व आरक्षणबाह्य गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे आगळेवेगळे धोरण राहुल शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने एका सामाजिक जाणिवेतून अमलात आणले आहे.





























































