
उत्तर प्रदेशमध्ये अंड्यांवर उत्पादन आणि एक्सपायरी डेट (वापराची अंतिम मुदत) टाकण्याची सक्ती येत्या 1 एप्रिलपासून केली जाणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही राज्यभरातील विव्रेत्यांना अंड्यांवर ‘एक्सपायरी डेट’ टाकणे अनिवार्य करावे, अशी मागणी समाजसेवक अॅड. नरेश दहिबावकर यांनी केली आहे.
मुंबईच्या उपनगरांतील अंडी विव्रेत्यांकडून खरेदी केलेली अंडी एक-दोन दिवसांतच खराब होतात. खरेदी करीत असलेली अंडी ताजी आहेत की फार दिवसांपूर्वीची याची माहिती ग्राहकांना मिळत नाहीत. काही डझनमध्ये अंडी खरेदी करणाऱया ग्राहकांना मोठय़ा प्रमाणावर अंडी खराब निघाल्याने ती फेकून द्यावी लागतात. अशा खराब अंड्यांची विक्री करताच कामा नये यादृष्टीने महाराष्ट्र सरकारने उत्तर प्रदेशच्या धर्तीवर अंड्यांवर ‘एक्सपायरी डेट’ची सक्ती करणारा निर्णय घेतला पाहिजे, असे अॅड. दहिबावकर यांनी म्हटले आहे. यासंदर्भात ते लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिक प्रोटीनसाठी आहारात प्राधान्याने अंड्यांचा समावेश करतात. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा गांभीर्याने विचार करून राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने भेसळ रोखण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असेही अॅड. दहिबावकर यांनी नमूद केले.





























































