
हिंदुस्थानचा माजी कर्णधार व प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी युवा सलामीवीर अभिषेक शर्माला थेट इशारा दिलाय. फक्त आक्रमकता पुरेशी नाही, तर ती मोठय़ा डावात रूपांतरित करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी वीरेंद्र सेहवागचा आदर्श समोर ठेवत खेळण्याचा सल्ला कुंबळेने दिलाय.
अभिषेक शर्मा झंझावाती फलंदाज आहे. तो नेहमीच स्ट्राईक रेटच्या प्रेमात असतो. त्यामुळे कुंबळेने त्याला कानमंत्र कम इशारा दिलाय की 200 च्या स्ट्राईक रेटने खेळतोयस म्हणून 300 चा विचार करू नकोस. जास्तीत जास्त चेंडू खेळ आणि डाव लांबव. 25 वर्षीय अभिषेक सध्या स्पह्टक सलामीसाठी ओळखला जातो, मात्र त्या सलामीला मोठय़ा धावसंख्येत बदलण्यात तो वारंवार अपयशी ठरत आहे. हीच खरी चिंता आहे आणि हीच चिंता अभिषेक नव्हे तर सर्वांना सतावतेय.
कुंबळेने सेहवागचा दाखला देत सांगितले की, तोही तितकाच आक्रमक होता, पण तो फॉरमॅटनुसार खेळाची गती बदलायला शिकला. 140-150 च्या स्ट्राईक रेटने खेळत असतानाही मोठे डाव उभे करण्याची कला त्याने आत्मसात केली होती. याच धर्तीवर अभिषेकनेही आपली शैली अधिक परिपक्व करणे गरजेचे असल्याचे त्यांनी कुंबळेने सांगितले. संजू सॅमसनचे उदाहरण देत त्यांनी स्पष्ट केले की, 20 चेंडूंत 50 धावांजवळ जाण्यापेक्षा 80-90 धावांची संस्मरणीय खेळी करणे संघासाठी अधिक फायदेशीर ठरते आणि टी-20 क्रिकेटमध्ये हीच खरी किंमत असते.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिव्हिलियर्सनेही अभिषेकला सातत्य आणि जबाबदारी वाढवण्याचा सल्ला दिला आहे. तो आता 25 वर्षांचा आहे, 20 नाही. त्यामुळे अपेक्षा वाढल्या आहेत आणि त्याने त्या पेलायलाच हव्यात,’ असे डिव्हिलियर्सने स्पष्ट केले. टी-20 वर्ल्ड कपमध्ये प्रभाव पाडण्यात अपयशी ठरलेल्या अभिषेकसमोर आता आयपीएलमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी आहे. सनरायझर्स हैदराबादला त्याच्याकडून केवळ धडाकेबाज सुरुवात नव्हे, तर सामना जिंकून देणाऱया मोठय़ा खेळींची अपेक्षा आहे.































































